‘बूटपॉलिशस्टाइल’वर कारवाईची हिंमत दाखवा

शेखर जोशी
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

रस्त्यांचे महाभारत - अभियंत्यांनी रहस्य उलगडावे! कारभाऱ्यांचे विचार ऐकण्यास जनता आतुर

रस्त्यांचे महाभारत - अभियंत्यांनी रहस्य उलगडावे! कारभाऱ्यांचे विचार ऐकण्यास जनता आतुर

खराब रस्ते करणारा मुंबईतील बडा ठेकेदार गजाआड झाला. सांगली महापालिकेतील ठेकेदारांनी कदाचित आपल्यावर देखील अशी वेळ नको म्हणून बचावाचा पवित्रा घेतला असावा! त्यांची बाजू ऐकून जनता हैराण आहे. ‘हे रस्ते तीन महिने टिकणारेच होते’, असा त्यांचा युक्तिवाद की गौप्यस्फोट ऐकून कारभाऱ्यांनी तर तोंडात बोटेच घातली आहेत. ४४ कोटींचे रस्ते काही दिवसांतच खड्ड्यात गेले, यासाठी ठेकेदारांचा काय सत्कार करायचा? बघू, आजच्या महासभेत कारभारी ठेकेदारांनी घडविलेल्या महाभारतावर काय बोलतात? त्यांना क्लीन चिट दिली तर जनता ‘स्टॅंडिंग’मधील अंडर स्टॅंडिंग समजून घेईलच! कारभारी काय बोलतात याकडे सांगली, मिरज आणि कुपवाडमधील सहा लाख जनतेचे लक्ष लागले आहे.

 

सांगलीकरांनो जागे व्हा! ज्यांनी दोन दिवसांत घडलेल्या बातम्या वाचल्या नसतील तर पुन्हा एकदा या गोष्टीकडे लक्ष द्या, की तुम्ही रस्त्यातून जाताना खड्ड्यात पडता... जखम झाली तर स्वत:च दवाखान्याचा खर्च उचलता. तुम्हाला खड्ड्यात घालणारे आता म्हणताहेत ‘आमचे रस्ते तीन महिने टिकणारेच आहेत.’ कारण काय? तर निवडणुकीवेळी कारभाऱ्यांनीच त्यांना असे (२५ मिलिमीटर जाडीचे) कमी जाडीचे रस्ते सांगितले! आता कारभारी म्हणताहेत ठेकेदारांनी एक छदामही न घेता रस्ते पुन्हा करून दिले पाहिजेत. कारभाऱ्यांच्या या भूमिकेवर आता ठेकेदारांनी आयुक्‍तांना भेटून रस्ते पावसाने वाहून गेले वगैरे सगळे सांगितले आहे. त्यांची बाजूही आम्ही वाचकांसाठी सविस्तर दिलेली होती. खराब रस्त्यांबाबत सर्वांत प्रथम ‘सकाळ’ने लक्ष वेधले. मग काही नगरसेवक तसेच सामाजिक संघटनांनी ठेकेदारांच्या कामावर आक्षेप नोंदविले. त्यानंतर कालच (सोमवारी) एक सुखद बातमीदेखील मिळाली की, अहल्याबाई होळकर चौक ते औद्योगिक वसाहत हा खराब रस्ता पुन्हा नव्याने करून देण्यासाठी ठेकेदार राजू आडमुठे यांनी सुरवातदेखील केली. त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे लोक स्वागत करतील; पण बाकीच्यांचे काय? कोट्यवधीचे बजेट नुसत्या रस्त्यावर खर्च झालंय... क्रीडांगणे, बागा यासारख्या सोई तर बाजूलाच राहिल्या. उपनगरांची अवस्था तर नरकयातनांसारखी झाली आहे. ड्रेनेजचा बट्ट्याबोळ तर लोकांच्या आरोग्याशी खेळतो आहे. या सर्वांसाठी पैसे नसताना जे आहेत ते रस्त्यावर खर्ची पडले आणि तरीही रस्त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या रस्त्यांसाठी कोण देखरेख करते? (ही सर्व कामे तत्कालीन आयुक्‍त अजिज कारचे यांच्या काळातील आहेत) आपल्याला माहीत आहे रस्त्यावर देखरेखीसाठी महापालिकेच्या अभियंत्यांवर आपण किती खर्च करतो? एक मुख्य अभियंता असतो, त्यांच्या नेतृत्वाखाली नगर अभियंता, शाखा अभियंता, ओव्हरशियर आणि मुकादम एवढे सगळेजण रस्त्याचा दर्जा ठरवणारी मंडळी आहेत. मग सारी अभियंता सेना करते काय? हे लोक कशाचा रिपोर्ट देतात?

 

लोकहो, पाच वर्षांतून एकदा फक्‍त मतदानासाठी बाहेर पडणार असाल तर या शहराच्या भवितव्याबाबतच एक भले मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. रक्ताला चटावलल्या कुत्र्यांचा एक कळप सहा वर्षांच्या कोवळ्या बालिकेच लचके तोडून तिला मारतो... तरी आपण गप्प बसतो. आता खराब रस्त्याने बळी गेले तरी बोलत नाही. त्यामुळे आता ठेकेदारसुद्धा आपला बचाव करून निसटू लागले आहेत. हे प्रश्‍न फक्‍त सांगलीपुरते नाहीत तर मुंबईसह बड्या महापालिकांतही असाच कारभार असतो. फरक फक्‍त एवढाच आहे त्या त्या ठिकाणी विरोधक आणि जनमताचा रेटा या विरोधात आवाज उठवितो. त्यामुळेच मुंबईत बड्या ठेकेदारावर कारवाई झाली. पावसाने रस्ते वाहून गेले आम्ही काय करू? हे ठेकेदारांचे उत्तर जनतेने भरलेल्या कराचा अवमान करणारे आहे. कारभारीच तकलादू रस्ते करायला सांगतात, असा आपला बचाव ठेकेदारांनी आयुक्‍तांसमोर केला आहे. सांगलीकर मनात म्हणताहेत ठेकेदारांनी हिम्मत असेल तर वाढत्या टक्‍केवारीने दर्जा घसरला हे सांगण्याचा प्रामाणिकपणा केला असता तर बचाव योग्य वाटला असता! एकेक रस्ते दोन-दोन कोटींचे असताना तीन महिनेच गॅरंटी?, हा काय प्रकार आहे. त्याबाबत अभ्यासू आणि जाणकार नगरसेवकांनी आजच्या महासभेत चर्चेतून विचार मांडले तर खड्ड्यांनी बेजार जनतेला आपण भरलेल्या कराचे काय होते ते तर कळेल? सार्वजनिक बांधकामने केलेली कामेही फार महान नाहीत...त्याचे रस्तेही मुदतपूर्व उखडले आहेत. अधिकारी आणि ठेकेदारांना जाब विचारण्याचा अधिकार माध्यमे आणि नागरिकांना आहे की नाही? जेथे स्थानिक स्वराज्य संस्था आपले कर्तव्य विसरते तेथे माध्यमांना लोकजागृती करण्याशिवाय पर्याय राहात नाही. लोकशाही ज्या चार स्तंभांवर उभी आहे, त्यातील माध्यमे आणि न्यायालये हेच लोकांचे आशास्थान आहे. माध्यमांनी लोकजागृती केली, की काहींचे बदनामी करताहेत असे ढोल सुरू होतात. तीन महिनेच आमच्या रस्त्याची गॅरंटी आहे असे म्हणाणाऱ्यांचा नागरिकांनी मारुती चौकात सत्कार करायचा काय? ठेकेदारांच्या शिष्टमंडळाला आयुक्‍तांनीही खडे बोल सुनावले आहेत. महापालिकेतील कामे घेऊन जे बडे झाले तेच ठेकेदार आज महापालिकाच चुकीची आणि आम्हीच बरोबर असे सांगण्याचे धाडस करते आहे! याला दोष कोणाला द्यायचा!

टॅग्स