साखरेला भाव नसताना वाढीव 'एफआरपी' देणे कठीण - नागवडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

श्रीगोंदे - उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) टनामागे 250 रुपये वाढविण्याची सरकारची घोषणा शेतकऱ्यांसाठी चांगली आहे. आम्ही त्याचे स्वागतच करतो. पण साखरेचे दर वाढविले, तरच ती देणे शक्‍य आहे, असे मत साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

कारखान्यांच्या अडचणी तशाच ठेवून वाढीव रक्कम देता येणार नाही. गेल्या वेळी "एफआरपी' देण्यासाठी घेतलेले कर्ज तसेच असताना आता वाढीव पैसे देणे जिकिरीचे होईल, अशी भीती नागवडे यांनी व्यक्त केली.
नागवडे म्हणाले, 'राज्यातील सहकारी साखर कारखाने शेतकऱ्याला जास्तीचे पैसे देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेतकरी टिकला, तरच कारखाने टिकणार आहेत. पण आता ही वाढीव "एफआरपी' कशी देणार? उसाला भाव देण्यासाठी साखरेला चांगला दर मिळाला पाहिजे. साखरेचे दर काही वर्षांत अनिश्‍चित झाले आहेतच; पण प्रमाणापेक्षा कमी दराने ती विकली जात आहे. साखरेला उठाव नसेल, तर उसाला कसा जादा दर देता येईल? सरकार याबाबत गंभीर दिसत नाही.''

नागवडे म्हणाले, 'दर अस्थिर होत असल्याने व्यापारी कमी दरात साखर उचलण्यासाठी टपलेले असतात. साखरेच्या दराची हमी घेतानाच निर्यातीवर अनुदान वाढवून देण्याचीही जबाबदारी सरकारची आहे. शेतकऱ्याला जास्त पैसे मिळावेतच; पण त्यासाठी कारखान्यांवर अजून कर्जाचा बोजा झाला तर सगळेच मोडकळीस येईल. गेल्या वेळी एफआरपी देण्यासाठी घेतलेले कर्ज फिटण्यापूर्वीच आता पुन्हा हा फतवा आला. साखरेची किंमत वाढवा आणि एफआरपी घ्या, अशीच स्थिती असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.''