शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कणकवली - यंदा परतीच्या पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने भात कापणीला विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतातच जाणार आहे. याखेरीज सततच्या पावसामुळे बाजारपेठांमध्येही तुरळक गर्दी आहे.

आकाशकंदिलांसह, विविध सजावटीच्या वस्तू ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा गणपती, नवरात्राप्रमाणे दिवाळीतही पाऊस पाठ सोडणार नाही असे चित्र आहे. दररोज दुपारी तीन नंतर न चुकता मुसळधार पाऊस कोसळत आहे. चांगल्या पावसामुळे भातशेतीचे चित्र यावर्षी चांगले होते.

पण अतिपावसामुळे हळवी भातशेती धोक्‍यात आली. त्यानंतर उशिरा होणारी भात पिकेही नुकसानीत आली आहेत. विविध राजकीय नेतेमंडळींनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. परंतु नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्यास अद्यापही सुरवात झालेली नाही.

सध्या सकाळच्या सत्रात भात कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. दुपारनंतर पाऊस होत असल्याने दिवस उजाडताच शेतकरी भात कापनीसाठी शेतात जात आहेत. शेतकरी राजा भातकापणीमध्ये अडकल्याने बाजारपेठांना अद्याप ऊर्जितावस्था आलेली नाही. दरवर्षी दसऱ्यापासून बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू होतात. मात्र पाऊस आणि नोटाबंदीमुळे बांधकाम क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आहे. यामुळे बाजारपेठांतील मरगळ अद्यापही कायम आहे.

यंदा थोडक्‍यात दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी फराळाच्या साहित्याची खरेदी केली. मात्र आकाश कंदील, विद्युत उपकरणे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कपडे आदींची खरेदी फारशी झालेली नाही. पुढील दोन दिवसांत मरगळलेल्या बाजारपेठेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. याखेरीज ग्रामपंचायत निवडणुका आटोपल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी शहरात येतील या अपेक्षेत व्यापारीवर्ग आहे.
गतवर्षीची नोटाबंदी आणि यंदा जीएसटीचा मोठा परिणाम शहरासह ग्रामीण भागात आहे. बांधकाम व्यवसाय ठप्प असल्याने त्यावर अवलंबून असलेले अनेक उद्योग आणि त्या क्षेत्रातील कामगारांवर अन्यत्र रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. यंदा जिल्ह्यातील काही कारागिरांनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कंदील तयार करून बाजारपेठांत विक्रीसाठी आणले आहेत. मात्र या कंदिलांनाही अद्याप उठाव मिळालेला नाही.