सोलापुरात सिद्धेश्‍वर यात्रेतील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापुरात सिद्धेश्‍वर यात्रेतील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर - सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेतील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदर्शनाला जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी हजेरी लावत आहेत. कृषी अवजारे, विविध तंत्रज्ञानासह शेती उपयोगी विविध साहित्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन एक मेजवानीच ठरले आहे.

सिद्धेश्‍वर देवस्थान समितीच्या या प्रदर्शनाचे यंदाचे 44 वे वर्ष आहे. अखंडितपणे दरवर्षी होम मैदानावर यात्राकाळात हे प्रदर्शन भरते. कालानुरूप त्यात सातत्याने बदल होत आले आहेत. सिद्धेश्‍वर देवस्थानच्या या उपक्रमाला कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचाही चांगलाच हातभार लागत असल्याने प्रदर्शनाने एक वेगळीच उंची गाठली आहे. यंदाही या प्रदर्शनात विविधांगी उपयुक्त उत्पादनांची रेलचेल दिसून आली. बहुराष्ट्रीय कंपन्यांपासून देशी बियाणे, विविध उत्पादनांच्या स्टॉलना शेतकरी भेट देऊन उपयुक्त वस्तू, अवजारे, बी- बियाणे यांची माहिती घेत आहेत.

रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस शेतकऱ्यांची भरभरून गर्दी राहिली. कृषी प्रदर्शनात जगातील सर्वांत जास्त आक्रमक श्वान आणण्यात आला आहे, हे एक आकर्षण या प्रदर्शनाचे आहे. शेतीच्या विविध वस्तूंसह रात्री शेतात राहण्यासाठी टेंट, पिकांच्या संरक्षणासाठी बंदूक इथे उपलब्ध आहे. त्याचा वापर स्वसंरक्षणापासून ते श्वान, कोल्हे, डुक्कर यांना पळवून लावण्यासाठी होऊ शकतो. त्याशिवाय सौर दिवे अन्‌ निर्धूर चुलीही आहेत. त्याशिवाय प्रदर्शनात ट्रॅक्‍टर, खते, बियाणे, विविध रोपे, ऊस, आंबे, मिरची, सीडलेस लिंबू आदींची रोपे, शेतीपूरक अवजारे, ड्रीपसाठी उपयुक्त उत्पादनेही कृषी प्रदर्शनात आहेत. सुमारे 200 स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत.

चर्चासत्रांनाही पसंती
कृषी विभाग आणि आत्माच्या सहकार्याने प्रदर्शनाच्या ठिकाणी डाळिंब, शेडनेट शेती आदी विषयांवर खास तज्ज्ञांच्या चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांनाही शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व चर्चासत्रांत प्रश्‍नोत्तरांमुळे शेतकरी- शास्त्रज्ञ संवादही चांगल्या पद्धतीने घडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com