एका ठरावामुळे रखडले विमानतळ विकासाचे काम

अभय दिवाणजी
गुरुवार, 13 जुलै 2017

बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची व्यथा
सोलापूर - ग्रामपंचायतीच्या केवळ एका ठरावामुळे बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा प्रवास रखडला आहे. वन विभागासाठी या ठरावाची गरज आहे.

बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची व्यथा
सोलापूर - ग्रामपंचायतीच्या केवळ एका ठरावामुळे बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा प्रवास रखडला आहे. वन विभागासाठी या ठरावाची गरज आहे.

बोरामणी व तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) या दोन गावांच्या हद्दीतील 550 हेक्‍टर जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्यातील बोरामणी हद्दीतील 33.59 हेक्‍टर क्षेत्र वन (फॉरेस्ट) विभागाच्या मालकीचे आहे. हे क्षेत्र वगळता अन्य क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे; परंतु वन विभागाच्या किचकट व अडचणींच्या कायदेशीर बाबींमुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेस विलंब होत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (एमएडीसी) विभागाने अन्य जमिनींची संपादन प्रक्रिया पूर्ण केली आहे. केवळ या 33.59 हेक्‍टर क्षेत्राच्या भूसंपादनाअभावी या संपादित क्षेत्राचा विकास करणे अडचणीचे ठरत आहे. या संदर्भात "एमएडीसी'कडून वन विभागाच्या नागपूरच्या मुख्य कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहारही झाला आहे.

भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना बोरामणी ग्रामपंचायतीकडून वन विभागाकडे असलेल्या क्षेत्राच्या संपादनासाठीचा ठराव पाठविण्याची सूचना करण्यात आली. यापूर्वी ग्रामपंचायतीने असा ठराव दिला होता; परंतु आता नव्याने बदललेल्या नियमानुसार (फॉरमॅट) ठराव देणे आवश्‍यक असल्याचे वन विभागाने कळविले आहे. यासाठी मार्च महिन्यापासून यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. जुलै महिना उजाडला तरी केवळ एका ठरावाअभावी विमानतळ उभारणीच्या कामात दिरंगाई होत आहे.

बोरामणी ग्रामपंचायतीकडून ठराव अपेक्षित आहे; परंतु तसे न झाल्यास शासन आदेशानुसार भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
- राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर

बोरामणी ग्रामपंचायतीकडून वन विभागाच्या 33.59 हेक्‍टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी ठरावाची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या ठरावानंतर विकासाला निश्‍चितच गती येईल.
- सज्जन निचळ, व्यवस्थापक, विमानतळ, बोरामणी

ग्रामसेवकाच्या बदलीमुळे ठराव करण्याचे काम राहिले आहे. आता नवे ग्रामसेवक आले आहेत. लवकरात लवकर ठराव करून देऊ.
- जैतुनबी पटेल, सरपंच, बोरामणी