देशमुखांतील वाद मिटू नये हीच श्रेष्ठींची ईच्छा 

subhash deshmukh and devendra fadanvis
subhash deshmukh and devendra fadanvis

सोलापूर - पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात सुरू असलेला वाद मिटू नये हीच पक्षश्रेष्ठींची ईच्छा आहे. त्यामुळे गटबाजीवरून इतका गदारोळ होऊनही त्याची काहीच दखल प्रदेश पातळीवरून घेतली गेली नाही.... ही मते आहेत खुद्द भाजपच्याच नगरसेवकांची. 

नगरसेवक म्हणून काहीतरी करून दाखविण्याच्या उद्देशाने आलेल्या पण दोन देशमुखांतील गटबाजीमुळे त्रस्त झालेल्या नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच महापौर शोभा बनशेट्टी आणि सभागृह नेते सुरेश पाटील यांच्यातील "शीतयुद्ध'कायम सुरुच असते. त्याचा फटका महापालिकेच्या कारभारास बसला असून, पक्षाची प्रतिमा डागाळली जात आहे. मात्र त्याचे सोयरसूतक ना पालकमंत्र्यांना आहे ना सहकारमंत्र्यांना. त्यामुळे नगरसेवक झाल्याचा पश्‍चाताप होत असल्याची भावना काही नगरसेवक उघडपणे बोलून दाखवत आहेत. 

एकीकडे गटबाजीमुळे भाजपचे नगरसेवक हैराण झाले असताना, दुसरीकडे श्री. पाटील यांनी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्याशी संपर्क साधून "युती'ची भाषा बोलण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेशी "अलिखित'युती करून हादरा देण्याची नियोजनबद्ध खेळी होत असल्याने सहकारमंत्री गटातील नगरसेवकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महापालिकेत शिवसेनेचे 21, तर पालकमंत्री गटाचे 35 नगरसेवक आहेत. "युती'चे सूर जुळले तर तब्बल 56 नगरसेवक एका बाजूला, तर सहकारमंत्री गटाचे 14 आणि इतर विरोधी पक्षाचे सदस्य अशी विभागणी होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री गटाचे वर्चस्व पालिकेत राहणार आहे. त्यामुळे दोन देशमुखांतील वाद मिटल्यावरच भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांना खऱ्या अर्थाने "अच्छे दिन'येतील असा सूर व्यक्त होत आहे. 

निरीक्षक व संघटकांनीही टेकले हात 
पक्षीय पातळीवरील बैठका घेण्यासाठी पक्षाचे संघटक व निरीक्षक वारंवार सोलापुरात येतात. त्यांनीही या गटबाजीचा धसका घेतला आहे. यापूर्वी दोन वेळेला सोलापुरात येऊनही त्यांनी फक्त जिल्ह्याची बैठक घेतली. शहराची बैठक घ्यायचे धाडस त्यांनीही दाखविले नाही. त्यामुळे पक्षाच्या संघटक व निरीक्षकांनीही गटबाजीपुढे हात टेकले, अशी प्रतिक्रिया भाजपमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com