पिलीव घाटात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह

पिलीव घाटात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह

अकलूज - पत्नी व दोन लहान मुलींची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची दुर्घटना सुळेवाडी (ता. माळशिरस) येथे घडली आहे. पिलीव घाटातील गायरान परिसरात सोमवारी (ता. 11) रात्री ही घटना घडली आहे. दरम्यान, पतीने पत्नी व मुलींना संपवून आत्महत्या केली की घातपात झाला, याबाबत आता वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत.

सुभाष श्‍यामराव अनुसे (वय 28), स्वाती सुभाष अनुसे (वय 25) आणि कु. ऋतुजा (वय 9) व कु. कविता (वय 8) अशी मृतांची नावे आहेत. चंडकाईवाडी-उंबरे (वे.) (ता. माळशिरस) येथील अनुसे वस्तीवरील ते रहिवासी आहेत. साधारणतः 15 वर्षांपूर्वी सांगवी (ता. पंढरपूर) येथील बिरा आबा सोलनकर यांची मुलगी स्वातीबरोबर सुभाषचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुली होत्या. श्रीपूरच्या श्री चंद्रशेखर प्राथमिक विद्यालयात त्या शिकत होत्या. सुभाष व स्वाती यांच्यात वारंवार भांडणे होत होती. सुमारे तीन वर्षांपूर्वी याच कारणावरून स्वाती माहेरी राहायला गेली होती. त्यानंतर नुकतीच ती सासरी आली होती, असे सांगितले जात आहे. सोमवारी (ता. 11) दुपारी हे चौघे दवाखान्यात जातो, असे सांगून घरातून गेले. सायंकाळी सुभाषचा भाऊ तानाजी याने अकलूज पोलिसात सुभाष, त्याची पत्नी व मुली गायब असल्याची तक्रार नोंदविली आहे. 

हत्या, आत्महत्या की घातपात?
सुभाष हा चंडकाईवाडी येथील अनुसे वस्तीवर राहात होता. सोमवारी (ता. 11) दुपारी तो पत्नी व मुलींसह दवाखान्यात जातो असे सांगून दुचाकीवरून गेला. त्यानंतर दवाखान्यात जातो असे सांगून गेलेले हे चौघेजण बेपत्ता आहेत, अशी तक्रार काही तासातच दाखल झाली व आज या चौघांचे मृतदेहच मिळाले. वास्तविक, पिलीव येथे त्यांचे कोणी नातेवाईक नाहीत. असे असताना हे चौघेजण त्या घाटात का गेले, तेथे नेमके काय घडले, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

घाटातील गायरानावरील थरार
सुभाषने निंबाच्या झाडाला सुती दोरीने गळफास घेतलेला आहे. त्याचे बनियन फाटलेले असून शर्टची बटणे तुटलेली आहेत. त्याच्यापासून काही अंतरावर त्याची पत्नी स्वातीचा मृतदेह पडला होता. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड पडला होता. तिच्या अंगावरील कपडे फाटलेले होते. पोटावर ओरखडे होते. अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या स्वातीच्या डोक्‍यात दगड घालून तिला मारण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसत होते. तेथून जवळच एका घळीतील झाडाला एकाच दोरीने कु. ऋतुजा व कु. कविता या दोघींचे मृतदेह लटकलेले होते. जवळच त्यांची दुचाकी उभी होती. ही घटना समजताच अकलूजचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक अरुण सावंत, उपनिरीक्षक संदीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. उत्तरीय तपासणीसाठी हे मृतदेह माळशिरस येथे पाठविले. या वेळी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले आहे.

घटनास्थळी तणाव
अनुसे परिवार व सुभाषच्या सासरची मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत होते. या संघर्षाची कल्पना असल्याने पोलिसांनी मोठी दक्षता घेतली होती. घटनास्थळी विशेष पोलिस पथकासह दंगाकाबू पथक तैनात करण्यात आले होते तर चंडकाईवाडी येथे रात्री उशिरा होणाऱ्या अंत्यविधीच्या वेळी पोलिस विशेष दक्षता घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

चिठ्ठीतील गूढ कायम
सुभाषच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहून ठेवल्याचे बोलले जात आहे. मात्र, तपासात व्यत्यय येऊ नये या कारणासाठी या चिठ्ठीतील मजकूर उघड करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार आहे की काय, असाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपासाला सुरवात केली आहे. 

श्रीपूर व चंडकाईवाडीत शोककळा 
कु. ऋतुजा व कु. कविता या श्रीपूरच्या श्री चंद्रशेखर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. आज शाळेच्या गणवेशातच त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. या घटनेने शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांसह चंडकाईवाडी येथील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com