सायबर सेलसाठी  मनुष्यबळाचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

सोलापूर - सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुरू करण्यात आलेल्या पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलला पोलिस ठाण्याचा दर्जा मिळणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे हा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर - सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुरू करण्यात आलेल्या पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलला पोलिस ठाण्याचा दर्जा मिळणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे हा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढताना दिसत आहे. अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी गुन्हे करून त्वरित गायब होतात. त्यामुळे त्यांना पकडणे जिकरीचे बनते. त्याकरिता शासनाने प्रत्येक पोलिस आयुक्तालयात तसेच ग्रामीण पोलिसांकडे सायबर सेलची स्थापना केली आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी या सेलचा मोठा उपयोग होत आहे. सायबर सेलला पोलिस ठाण्याचा दर्जा दिल्यास अशा गुन्ह्यांचा तपास अधिक सोपा होणार आहे. त्याकरिता गृह विभागाने सायबर सेलला पोलिस ठाण्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गृह विभागाने पोलिस ठाण्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला असला तरी शहर पोलिस आयुक्तालयाकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ पाहता या निर्णयाची अंमलबजावणी करणे कितपत सोयीचे ठरणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलिस ठाण्याचा दर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी दोन पोलिस निरीक्षक, पाच सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ३० कर्मचारी इतके मनुष्यबळ पुरवावे लागणार आहे. याशिवाय सायबरच्या अनुषंगाने तांत्रिक सुविधांचीही पूर्तता करावी लागणार आहे. सध्या सायबर सेलकडे एक सहायक पोलिस निरीक्षक आणि आठ कर्मचारी इतकेच मनुष्यबळ आहे. शहर सायबर सेलला पोलिस ठाण्याचा दर्जा देण्यासाठी एक पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच १० कर्मचारी देण्यात यावेत, अशी मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास सायबर सेलला पोलिस ठाण्याचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.