शेतकऱ्यांना वेठीस धरू नका -  सहकारमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चेसाठी तयार आहेत. चर्चेच्या माध्यमातून याबाबत सकारात्मक तोडगा निघू शकतो. संघटनांनी शेतकऱ्यांचे नुकसान वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत

सोलापूर - 'संपामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरू नका,' असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकरी संघटनांना केले. 

सोलापूर स्मार्ट सिटी अभियानंतर्गत येथील हॉटेल सरोवरमध्ये आयोजिलेल्या कार्यशाळेचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

देशमुख म्हणाले,""या आंदोलनामुळे लाखो लिटर दूध रस्त्यावर ओतले जात आहे. पालेभाज्याही फेकल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचेच मोठे नुकसान होत आहे. संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चेसाठी तयार आहेत. चर्चेच्या माध्यमातून याबाबत सकारात्मक तोडगा निघू शकतो. संघटनांनी शेतकऱ्यांचे नुकसान वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत.'' 

दुधाचा भाव किती असावा हे अनेक संघ स्वतःहून निश्‍चित करतात. दुधाच्या हमी भावाबाबत राज्यातील दूध संघ आणि शासनाच्या बैठकीत चर्चा होऊ निर्णय होऊ शकतो, असेही देशमुख म्हणाले.