खत दुकानांची तपासणी कृषी विभागाकडून सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सोलापूर - कृषी विभागाने येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. या हंगामामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणारे बियाणे, खते योग्य आहेत की नाहीत. ते देताना संबंधित दुकानदाराने काय खबरदारी घ्यावी, याबाबत जिल्ह्यातील सर्वच खत दुकानांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिले आहेत.

यंदाच्या वर्षी राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्या दृष्टीने खरीप हंगामाची जोरदार तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील खत व औषधांच्या दुकानांची तपासणी करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी व पंचायत समित्यांच्या कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात परवानाधारक असलेल्या दुकानदारांची यादी संबंधित तालुक्‍याच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायकांना तपासणी करण्यासाठी दुकाने निश्‍चित करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या पाच जूनपर्यंत जिल्ह्यातील सगळ्या खत-औषध दुकानांची तपासणी पूर्ण करायची आहे. तपासणी केल्याचा अहवाल 10 जूनपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे देण्यात आल्या आहेत.