'जलयुक्त'नंतर आता चारायुक्त शिवार

संतोष सिरसट
सोमवार, 31 जुलै 2017

रूपरेषा निश्‍चितीसाठी समिती; दूग्ध उत्पादन वाढीवर राहणार भर

रूपरेषा निश्‍चितीसाठी समिती; दूग्ध उत्पादन वाढीवर राहणार भर
सोलापूर - राज्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक जिल्ह्यांतील दुष्काळाचे सावट बऱ्यापैकी कमी झाले आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता त्याच धर्तीवर "चारायुक्त शिवार योजना' राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती नेमली आहे.

राज्यात दोन-तीन वर्षांतून एकदा दुष्काळाचे संकट येत आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेत राज्यातील लाखो लोकांनी सहभाग घेतला. अनेक ठिकाणी लोकसहभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाली. त्या कामाचा चांगला फायदा काम करणाऱ्या गावकऱ्यांसाठी झाल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक गावे दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

लोकांची चळवळ बनलेल्या या योजनेमुळे राज्याचा दुष्काळ कमी होण्यास मदत झाली आहे. त्याच धर्तीवर चारायुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चारायुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यातील दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

चारायुक्त शिवार योजना कशी असावी, तिची अंमलबजावणी कशी करावी, राज्यातील सध्याची वैरण उपलब्धता व उत्पादन, देशातील विविध समाजघटक, सरकार, नागरी संस्था यांनी राबविलेल्या यासंदर्भातील योजनेचा अभ्यास करणे, ही योजना राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करणे, निधी उभारणीसाठी पर्याय सुचविणे हे काम या समितीला करावे लागणार आहे. राज्यातील इतर विभागाच्या काही योजना या योजनेसारख्या असतील तर त्यांचाही अभ्यास करून एक परिपूर्ण योजना तयार करण्यावर ही समिती काम करणार आहे. या समितीमध्ये सचिव, आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत.
 

पारदर्शकतेसाठी ऍप
"चारायुक्त शिवार' या योजनेची रूपरेषा ठरविताना तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व लोकांना या योजनेचा फायदा व्हावा, यासाठी ऍप तयार करण्याच्या सूचनाही या समितीला देण्यात आल्या आहेत.