' सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत करा घटस्थापना'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

सोलापूर - अश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या देवी नवरात्रोत्सवाची सुरवात उद्या (गुरुवारी) घरोघरी घटस्थापनेने होत असून सकाळी सूर्योदयानंतर मध्यान्ह काळापर्यंत घटस्थापना करता येईल, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी "सकाळ' ला सांगितले. 

उद्या प्रतिपदा तिथी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपर्यंत असली तरी घटस्थापना मध्यान्हापर्यंत करता येणार आहे. यंदा नवरात्रोत्सवात रविवारी (ता. 24) ललिता पंचमीचे पूजन, बुधवारी (ता. 27) महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), गुरुवारी (ता. 28) महाअष्टमीचा उपवास व सरस्वती पूजन आहे. महानवमी नवव्या दिवशी शुक्रवारी (ता. 29) आहे. यादिवशी मालाबंधनानंतर नवरात्रोत्थापन करावे, असे श्री. दाते यांनी सांगितले. शनिवारी (ता. 30) विजयादशमी (दसरा) उत्सव साजरा करावा. यादिवशी सीमोल्लंघन, अश्‍व व शमीपूजन करण्याचा प्रघात आहे. 

नवरात्र घटस्थापना करण्याविषयी 
देवघरास आंब्याच्या पानाचे तोरण लावून देशकाल कथनाने घटस्थापना, मालाबंधन, अखंड नंदादीप, सप्तशती पाठ, कुमारिका पूजन यापैकी जे जे करणार आहोत त्या उल्लेखाने संकल्प करावा. महागणपती, कलश, शंख, घंटा पूजन करावे. श्री सूक्‍ताने अभिषेक करावा. रोज एक फुलांची किंवा कापसाची माळ बांधावी. अखंड नंदादीप लावावा. रोज नैवेद्य दाखवावा. नंदादीप वाऱ्याने किंवा काजळी काढताना विझल्यास ते अशुभ मानू नये, तो पुन्हा लावावा.