शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सोलापूर -  रूपाभवानी मंदिरात गुरुवार (ता. 21) पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरात शामियाना उभारणीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे भक्तांनी मंदिरास भेट दिलेल्या 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंदा मंदिर परिसरात निगराणी असणार आहे. 

सोलापूर -  रूपाभवानी मंदिरात गुरुवार (ता. 21) पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरात शामियाना उभारणीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे भक्तांनी मंदिरास भेट दिलेल्या 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंदा मंदिर परिसरात निगराणी असणार आहे. 

मंदिराच्या शिखराला आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, ती उद्या (बुधवार) पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 10 दिवस भक्तांच्या गर्दीचा विचार करून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगेची व्यवस्था केली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून, त्यांना मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांची मदत होणार आहे. मंदिर परिसरात जत्रा भरत असल्याने पूजा साहित्याची दुकाने थाटली आहेत. त्याचप्रमाणे खेळणी, बांगड्या, रसपानगृह व विविध साहित्य विक्रीची स्टॉल उभारणी पूर्ण होत आली आहे. 

नवरात्रोत्सव कार्यक्रमांची माहिती देताना मंदिराचे मुख्य पुजारी राजू पवार म्हणाले, ""तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील विधींनुसारच रूपाभवानी मंदिरात पूजाअर्चा होणार आहेत. गुरुवारी (ता. 21) पहाटे चार वाजता चरणतीर्थ आरतीने मंदिर उघडण्यात येईल. सकाळी सात वाजता महापूजेस सुरवात होऊन आठ वाजता घटस्थापना व नऊ वाजता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून जत्रेस प्रारंभ होणार आहे. सलग नऊ दिवस रात्री 9.30 वाजता छबिना कार्यक्रम होणार आहे. दसऱ्याला दुपारी चार वाजता मंदिरातून पालखी निघून पार्क मैदानावरील शमीच्या झाडाला सीमोल्लंघन खेळून पालखी रात्री 11 वाजता मंदिरात येईल.'' 

सर्व भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शनरांगेची व्यवस्था केली आहे. भक्तांनी मंदिरास भेट दिलेल्या सीसीटीव्हीमुळे मंदिर परिसरातील एकूण परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. नवरात्रोत्सव शांततेत व आनंदात साजरा व्हावा, यासाठी मंदिरातर्फे सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. 
- राजू पवार, मुख्य पुजारी, रूपाभवानी मंदिर 

Web Title: solapur news navratri rupabhavani temple