दूध खरेदीतील दरवाढ सोलापूर जिल्ह्यात नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

सोलापूर - शेतकऱ्यांच्या संपानंतर सरकारने दुधाच्या खरेदी दरामध्ये तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी पुणे विभागातील 23 पैकी 19 सहकारी दूध संघांनी केली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील संघ यामध्ये मागे आहेत. या संघांनीही उत्पादकांना दरवाढ द्यावी, यासाठी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख पाठपुरावा करत आहेत.

सरकारी निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या संघांना विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांनी नोटिसा दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील सोनहिरा दूध संघानेही वाढीव दर उत्पादकांना दिला नव्हता. मात्र, मागील एक-दोन दिवसापासून त्या संघाने वाढीव दर देण्यास सुरवात केली असल्याची माहिती पुणे येथील सहकारी संस्थांचे (दुग्ध) विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी "सकाळ'ला दिली.

आज निर्णयाची अपेक्षा
जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक उद्या (सोमवारी) होण्याची शक्‍यता आहे. त्या बैठकीमध्ये सरकारने नव्याने लागू केलेल्या दूध दरवाढीच्या विषयावर निर्णय होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली.