शिक्षक संघटना काढणार 17 जूनला राज्यभरात मोर्चे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सोलापूर - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्ये सरकारच्या शिक्षक बदली आदेशाला विरोध करण्यासाठी 17 जूनला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. 15 जूननंतर शिक्षकांच्या आस्थापनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये, 27 फेब्रुवारीच्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करावी. मात्र, त्यापूर्वी त्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, या वर्षीच्या बदल्या स्थगित करून शिक्षकांचे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्‍न सोडवावेत, अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सरकारने वेळीच दखल न घेतल्यास 17 जूनला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढण्याचा निर्णयही या बैठकीत झाला आहे.

15 जूनपासून काळ्या फिती लावून काम
शिक्षकांच्या या मागण्यांकडे ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक 15 जूनपासून काळ्या फिती लावून काम करतील. शासनाचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावण्याचा निर्णयही बैठकीत झाला.