शेवटचा प्रयत्न म्हणून दिलेल्या परिक्षेत तहसीलदार झालेले स्वप्निल रावडे

स्वप्निल रावडे यांचा प्रेरणादायी यशोगाथा
Swapnil Ravade
Swapnil RavadeSakal

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - प्रत्येक अपयशानंतर एक संधी आपली वाट पाहत असते. त्यामुळे बहुतेकजणांच्या अपयशामध्ये यशाचे गुपित दडलेले असते. त्या अपयाशातूनच एखाद्या रचनात्मक कामाची सुरुवात होऊन त्यातून भाग्योदय होतो. 'जे घडते ते चांगल्यासाठीच असते' याचा अनुभव अनेकांना आला आहे त्यापैकीच एक असलेले पारनेर (जि. अहमदनगर) तालुक्यातील स्वप्निल रावडे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नौदलासाठी प्रयत्न केले. परंतु सातत्याने अपयश मिळत गेले. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यातही अपेक्षित यश मिळत नसल्याने, शेवटचा प्रयत्न म्हणून दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेतून तहसीलदारपदी निवड झाली आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

याबद्दल तहसीलदार स्वप्निल रावडे सांगतात की, मुळ गाव कडुस (ता.पारनेर, जिल्हा अहमदनगर) येथील, वडील शिक्षक आई गृहिणी होती. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रुई छत्रपती या गावात वास्तव्यास होतो. त्यामुळे तेथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक तर माध्यमिक शिक्षणही तिथेच झाले. त्यानंतर पुणे येथील नूतन मराठी विद्यालयातुन विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. वडील नोकरीला असल्याने आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्याकडून कसलीही आर्थिक चणचण भासत नसायची.

लहानपणापासून इतरांप्रमाणे माझही एक छोटेसे स्वप्न होते. ते म्हणजे नौदलात नोकरी करायची. त्याचे कारणही असं होते की, परिचयाची एक व्यक्ती नौदलात कार्यरत होती. त्यांचा रूबाब व त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर लहानपणी शाळेत असतानाच पडली. आपणही असे अधिकारी व्हावे‌. देशसेवेसाठी वाहुन घ्यावे अशी स्वप्ने त्यावेळी मी रंगवत असायचो. परंतु त्यासाठी चांगले शिक्षण घेतले पाहिजे. एकावेळी एकच ध्येय ठेवून त्यामध्ये चांगले प्राविण्य मिळवले पाहिजे. त्यामुळे शिक्षण घेत असताना फक्त शैक्षणिक गुणवत्तेवर पुर्णपणे लक्ष केंद्रित केले. कॉम्प्युटर इंजिनियरिंगची आवड असल्याने, बारावीनंतर एमआयटी कॉलेज येथून चांगल्या गुणांनी ते पुर्ण करून घेतले. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मनात कोणतेही ध्येय पक्के नव्हते. फक्त नौदलबद्दल एक आकर्षण होते.

करिअरच्या बाबतीत विचार करताना माझे प्राधान्य हे देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी होते. त्यामुळे अशा क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. त्यात लहानपणापासून ग्रामीण भागाशी नाळ जोडली असल्याने, शहरी भागात मन रमत नसायचे. त्यामुळे इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे, मुंबईसारख्या शहरात नोकरी करायची नाही. हे मात्र मनात पक्कं ठरवलं असल्याने, नौदलात नोकरी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

त्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी अकॅडमीत भरती झालो. त्यावेळी तेथील एक ब्रिगेडियर 'तु हे करू शकतो, तु नौदलात भरती होऊ शकतो' असे आत्मविश्वासाने सांगत प्रोत्साहन देत असायचे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे एक नवीन ऊर्जा निर्माण होत असायची. भोपाळ, बेंगलोर अशा विविध ठिकाणी SSB मुलाखती देत राहिलो. परंतु अनेक प्रयत्न करूनही त्यामध्ये यश न मिळाल्याने, करिअरचा मार्ग बदलला. इंजिनिअरिंगच्या काळात स्पर्धा परीक्षाबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे त्या क्षेत्रात आपल्याला पाहिजे तसा वाव मिळेल. व ग्रामीण भागात नोकरी करून समाजसेवा करण्याची देखील संधी मिळेल या अपेक्षेने स्पर्धा परीक्षेकडे वळलो.

एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. चांगल्या मित्रांची साथ लाभली. त्यामुळे अभ्यास चांगला जोमाने व जिद्दीने सुरू ठेवला. पहिल्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली. परंतु अपेक्षित यश नसल्याने, पुन्हा अभ्यास सुरू होताच. राज्यसेवेच्या देखील पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली. परंतु अगदी थोडक्या गुणांनी अंतिम यादीत नाव आले नाही. त्यामुळे हताश झालो‌‌. एक-एक वर्ष निघून जात असल्याने, आणखी किती वर्षे प्रयत्न करायचे म्हणून बस झालं आता. त्यामुळे शेवटचा प्रयत्न करू म्हणून पुन्हा एकदा जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. पाठिमागील चुकांची पुनरावृत्ती न होऊ देता आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे गेलो. अन् अखेर स्पर्धा परीक्षेचा शेवट म्हणून दिलेल्या दुसऱ्या प्रयत्नात तहसीलदार म्हणून निवड झाली.

पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालो असतो तर कदाचित त्यावेळी नायब तहसीलदारपदी निवड झाली असती. ती निवड झाली असती पर पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला नसता. त्यामुळे त्या परिक्षेत अनुउत्तीर्ण झाल्यानेच हे यश पहायला मिळाले असे वाटते. त्यामुळे जे घडते ते चांगल्यासाठीच असते. याची प्रचिती या यशात अनुभवयास मिळाली.

सध्या मंगळवेढा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील तळागळातील समाजासाठी सेवा करण्याची संधी मिळत असुन, मनात असलेले स्वप्न खऱ्या अर्थाने पुर्ण झाले आहे. येथे काम करत असताना, कॉम्पुटर इंजिनीअरिंगचा देखील फायदा होत असून, तहसील कार्यालयात नागरिकांना एकाच कामासाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी आत एक उपाय काढला असुन, मी स्वतः एक एप्लीकेशन तयार करत असून, त्याद्वारे नागरिकांना सुलभ व जलद जलद गतीने प्रशासकिय कामे पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याअगोदर आवडत्या क्षेत्रातील पदवीचे शिक्षण उत्तमरीत्या पुर्ण करून घेतल्यानंतरच स्पर्धा परीक्षा असो कि इतर कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com