दक्षिण, उत्तरेतील आमदारांची प्रतिष्ठा पणाला

दक्षिण, उत्तरेतील आमदारांची प्रतिष्ठा पणाला

कऱ्हाड - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. गटातटाच्या राजकारणाला तालुक्‍यात गती येऊ लागली आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठी टक्कर होत आहे. दोन्ही मतदारसंघातील राजकीय स्थिती वेगळी असली, तरी प्रत्येक ठिकाणच्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवत विरोधक दक्षिण व उत्तर मतदारसंघातील दोन्ही विद्यमान आमदारांपुढे आव्हान उभे करण्याची खेळी आखत असल्याचे दिसते. दक्षिणेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यात १२ गट व २४ गण आहेत. त्यात कऱ्हाड दक्षिणेत सर्वाधिक गट व गण आहेत. उत्तरेत चार गट आहेत. सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेतल्यास दोन्ही मतदारसंघांतील विरोधकांनी त्यांच्या पातळीवर विद्यमान आमदारांविरोधात आघाडीच उघडल्याचे दिसते. राजकीय परिस्थितीत विरोधकांशी हातमिळवणी करून आमदारांविरोधात आघाडीच उघडल्याचे दिसते. त्या सगळ्यांच्या विरोधात टक्कर देताना आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कऱ्हाड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर, भाजपचे अतुल भोसले यांच्या मैत्रीपर्वाचे आव्हान आहे. ‘राष्ट्रवादी’चे राजेश पाटील- वाठारकर, अविनाश मोहिते व राजाभाऊ उंडाळकर यांचा झालेला ‘राष्ट्रवादी’तील प्रवेश म्हणेज ‘राष्ट्रवादी’ची वाढलेली ताकद, त्यांच्या व्यूहरचनेचे आव्हान भेदून पृथ्वीराज चव्हाण गटाला यशाची शिखरे पादाक्रांत करावी लागणार आहेत. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शहराच्या नगराध्यक्षपदाला गवसणी घातल्याने भाजप पक्षही ‘चार्ज’ झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीही चाचपणी करत वेगळी आखणी केली आहे. त्यात भाजपचे अतुल भोसले कितपत त्यांच्यासोबत आहेत, ते अद्यापही स्पष्ट नाही. मात्र, पक्षाची भूमिका मान्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भोसले व उंडाळकर यांच्या मैत्रीपर्वाची ताकद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अधिक गतीत येण्याची शक्‍यता आहे. कऱ्हाड तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी तयारी केली आहे. मात्र, त्यांना गणित जुळवावे लागणार आहेत. दक्षिणेत भाजपबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली ताकद पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे आव्हान बनल्याचे दिसते. वर्षा- दोन वर्षांत कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी आमदार उंडाळकर यांचे पुतणे राजाभाऊ उंडाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. त्यामुळे रेठऱ्यासह उंडाळे भागात राष्ट्रवादीला ‘स्पेस’ मिळाला आहे. त्याचा फायदा उठवण्यासाठी राष्ट्रवादी एकसंधपणे काम करेल, असेच दिसते. राजेश पाटील- वाठारकर यांची ताकद पूर्वीपासून आहेच. त्या ताकदीला मोहिते, उंडाळकर यांची आता साथ मिळणार आहे. पृथ्वारीज चव्हाण यांनीही कऱ्हाड दक्षिणेत लक्ष केंद्रित करून अनेक विकासकामे केली आहेत. त्याला भेद देण्याचे काम विरोधकांना करावे लागणार आहे. केलेली विकासकामे, श्री. चव्हाण यांची क्‍लीन प्रतिमा व नव्याने झालेली गट बांधणी अशा अनेक जमेच्या बाजू विरोधकांनाही जड ठरू शकतात. मात्र, राजकीय हालचाली काय होणार कोणता गट काय भूमिका घेणार यावर सार काही अवलंबून आहे. 

कऱ्हाड उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या धैर्यशील कदम यांच्या गटाचे आव्हान आहे. नव्याने वाढलेल्या भाजपच्या ताकदीचाही विचार त्यांना करावा लागणार आहे. मनोज घोरपडे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश व भाजपच्या आताच्या असलेल्या वातावरणाचा प्रभाव ग्रामीण भागात कितपत रुजला आहे, याचा अंदाज घेऊन मनोज घोरपडे व भाजपला खेळी करावी लागणार आहे. त्यात त्यांचा मुत्सद्दीपणा अधिक फायदेशीर ठरणार आहे. काँग्रेसच्या धैर्यशील कदम यांच्या गटाच्या विरोधाचा विचार आमदार पाटील यांना करावा लागणार आहे. आमदार पाटील यांनी मागील वेळी उत्तरेतील सर्वच जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. ती परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यासाठी विरोधकांची खेळी काय असेल, त्यात कोणत्या बाजू सक्षम आहेत, याचाही विचार त्यांना करावा लागणार आहे. 

बाळासाहेबांना व्यूहरचना आखाव्या लागणार
विरोधक कोणता उमेदवार देणार, उमेदवार निवडीचा होणार घोळ व त्यातून नाराज होणाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करून आमदार बाळासाहेब पाटील यांना उत्तरमध्ये आपल्या यशासाठी वेगळ्या व्यूहरचना आखाव्या लागणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com