शेतकऱ्यांचा कट्टरतावाद उभा करू - आमदार बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

श्रीगोंदे - कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना झुलवण्याचा सरकारचा उद्देश समोर आला आहे. सामान्य माणसाच्या वाटेला जाल, तर आता जातीसाठी रस्त्यावर येणाऱ्या शेतकऱ्याला सोबत घेऊन सरकारला वठणीवर आणण्यासाठी कट्टरतावाद उभा करू, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी दिला.

श्रीगोंदे - कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना झुलवण्याचा सरकारचा उद्देश समोर आला आहे. सामान्य माणसाच्या वाटेला जाल, तर आता जातीसाठी रस्त्यावर येणाऱ्या शेतकऱ्याला सोबत घेऊन सरकारला वठणीवर आणण्यासाठी कट्टरतावाद उभा करू, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी दिला.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बाळासाहेब नाहाटा यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी व्यंकनाथ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात कडू बोलत होते. कडू म्हणाले, 'सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना जाणीवपूर्वक बगल देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी लढणाऱ्यांना "मॅनेज' करण्याचे उद्योग होत असले, तरी मी त्यातला नाही. मंत्रिपद देऊन मला थांबवतील, हा कुणाचा भ्रम असेल तर तो काढून टाका. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांपासून इंचभरही मागे हटणार नाही. भाजप मला घालविण्यासासाठी नव्हे, तर मी भाजपला घालविण्यासाठी टपलोय.''

रामदेवबाबांची औषधे परदेशात विकलेली चालणाऱ्या सरकारला शेतकऱ्याचा माल मात्र बाहेर गेलेला चालत नसल्याचा आरोप करीत कडू म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे विरोधकही भांडवल करीत आहेत. शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले आहेत; मात्र आपण शेतकऱ्यांसाठीच लढत राहणार आहोत. शेतकऱ्यांचे संघटन झाले, तरीही सरकार नमले नाही. सरकारला वठणीवर आणण्यासाठी व न्याय मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा कट्टरतावाद उभा करून आरपारची लढाई उभारावी लागेल.''

विखे-फडणवीस प्रेम राधा-कृष्णासारखे!
विरोधी पक्ष जिवंत आहे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून बच्चू कडू म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांसोबत मैत्री असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सांगत आहेत. मात्र, विखे यांचे मुख्यमंत्र्यांवरील प्रेम राधा-कृष्णासारखे आहे. त्यांचा प्रेमभंग कधी होतोय, हे आता शेतकऱ्यांनी पाहत बसायचे का? दोन्ही पक्षांतील ही बनवाबनवी आहे.''

Web Title: srigonde news mla bacchu kadu talking