दहावी, बारावीत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

सातारा - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाण कमी आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवेसह विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा टक्‍का कमी आहे. तो वाढविण्यासाठी शालेय वयात दहावी, बारावीमध्येच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

सनदी परीक्षांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने अ. ल. बोंगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. त्या समितीने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नागरी सेवा परीक्षांबाबत महाराष्ट्रातील मुलांना असणारा न्यूनगंड, परीक्षेची काठीण्यपातळी व माध्यमाबाबतचा गैरसमज, परीक्षेतून मिळणाऱ्या यशप्राप्तीनंतर लाभणाऱ्या संधी याबाबतच्या माहितीचा अभाव या बाबी निदर्शनास आणून दिल्या. त्या अनुषंगाने शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांच्या माहिती विद्यार्थ्यांना व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील झाला आहे. इयत्ता दहावी व बारावीत मुलांना स्पर्धाचे परीक्षांची माहिती देण्याबाबत पाच ऑक्‍टोबरला शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे.

‘कॅच देम यंग’ या सूत्राप्रमाणे दहावी व बारावीपासून स्पर्धा परीक्षांची माहिती देण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालकांनी माहिती संकलित करावी. ‘यशदा’, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शन घेण्यात यावे, जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या इयत्तांत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व पालकांचे दोन दिवसांचे शिबिर घ्यावे. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत. नागरी सेवा परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आयोजित करावे. आयएएस, आयपीएस याशिवायही शासकीय सेवांकरिता होणाऱ्या निवडींची माहिती द्यावी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी केल्याने आपोआपच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचीही तयारी होणार आहे.

वृत्तपत्र वाचनासही प्रोत्साहन 
स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्‍त ठरणारी इंटरनेटवरील माहिती व वृत्तपत्रांचे वाचन वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यात यावे. परीक्षांची तोंड ओळख करून देण्यासाठी या परीक्षांची माहितीही पाठ्यपुस्तकांत देण्यात येणार आहे, तसेच शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र स्थापन करावेत, या संबंधीचा अध्यादेश उपसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी काढला आहे.

Web Title: SSC, HSC examinations guidance contest

टॅग्स