पक्षी पुनर्वसन केंद्र उभारणीस सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

सांगली - "सकाळ माध्यम समूह', शहरातील विविध पक्षी-प्राणिप्रेमी संघटना, महानगरपालिका, वन विभाग आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने "चला, पक्षी वाचवूया' उपक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. येथील शास्त्री उद्यानात पक्षी पुनर्वसन केंद्राच्या उभारणीस आजपासून सुरवात झाली. येत्या सोमवारी सकाळी साडे दहा वाजता उद्यानात मोहिमेस प्रारंभ होईल. सकाळी नऊ वाजता राममंदिर चौकातून "पक्षी वाचवा' संदेश देणारी दिंडी निघणार आहे. विविध संघटना, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. 

पक्ष्यांचा चिवचिवाट, तेच भरगच्च थवे, अंगणातील पक्ष्यांचा धिंगाणा पुन्हा अनुभवण्यासाठी या मोहिमेत सारे सांगलीकर एकत्रित झाले आहेत. तीन महिने ही मोहीम शहरात राबवली जाणार आहे. पक्षी पुनर्वसन केंद्रासह शाळा-महाविद्यालयात प्रबोधनात्मक व्याख्याने, जखमी पक्ष्यांसाठी हेल्पलाइन, उद्यानात कृत्रिम घरटी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आयुक्त रवींद्र खेबुडकर, विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण, नगरसेवक शेखर माने, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल मडके यांच्यासह शहरातील तीस डॉक्‍टर यांच्या पुढाकाराने मोहिमेला बळ मिळाले आहे. शहरातील विविध पक्षिमित्र संघटनांचाही यात सक्रिय सहभाग आहे. शाळा-महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, सांगलीकर नागरिकांनीही यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सहभागी संस्था 
"सकाळ माध्यम समूह', साम टीव्ही, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क, महानगरपालिका, वन विभाग, आयएमए, वेलनेस, ऍनिमल सहारा फाऊंडेशन, खोप बर्ड हाऊस, ऍनिमल राहत, इन्साफ फाऊंडेशन, बर्ड सॉग्स्‌, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप, रॉयल्स यूथ स्टुडंट फाउंडेशन. 

शहरातील पाच उद्यानांत कृत्रिम घरटी 
शहरातील पाच विविध उद्यानांत कृत्रिम घरटी उभी करण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या आवाहनाला "आयएमए'चे अध्यक्ष डॉ. अनिक मडके यांनी सकारात्मकता दाखवली. त्यानुसार शहरातील तीस डॉक्‍टर पुढे आले असून त्यांनी कृत्रिम घरटी देण्याचे मान्य केले आहे. त्यात शास्त्री उद्यान, प्रतापसिंह उद्यान, आमराई, सानेगुरुजी उद्यान, महावीर उद्यानाचा समावेश आहे. त्याचीही जय्यत तयारी सुरू आहे. 

रॅलीचा मार्ग 
सकाळी नऊ वाजता राममंदिर चौकात एकत्रीकरण. राममंदिर चौक-सिव्हिल हॉस्पिटल चौक-झुलेलाल चौक-बसस्थानक परिसर-शास्त्री उद्यान. रॅलीत सहभागी होणाऱ्या शाळांनी "सकाळ' शी संपर्क साधावा. तसेच पथनाट्य सादर करणाऱ्या ग्रुपनीही संपर्क साधावा. संपर्कासाठी (9975257750-शैलेश पेटकर). 
.... 
चौकट 
नागरिकांसाठी आवाहन 
पक्ष्यांची तहान भागवावी, यासाठी संवेदनशील व्यक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. अनेक जण आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत, बंगल्याच्या छतावर किंवा अंगणात पाणी ठेवण्याची व्यवस्था करतात. काही जण नियमित खाद्यपदार्थही ठेवतात. तुम्हीही असाच प्रयत्न करून पाहा किंवा काहींनी केलाही असेल. तुमच्या वेगळ्या प्रयत्नांची माहिती आमच्यापर्यंत पाठवा. यासंबंधीचे काही फोटो असतील तर तेही नक्कीच पाठवा. वेगळ्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली जाईल. संपर्क ः व्हॉटस्‌ऍप (9146095500) किंवा sansakal@gmail.com या संकेतस्थळावर मेल करा.