तिच्यातील 'आई' चिडते, रडते; करुण कहाणी एका कुत्रीची

अजित झळके
बुधवार, 12 एप्रिल 2017

बिचारीचं वाईट वाटतं
या घटनेच्या साक्षीदार असलेल्या चंद्रभाग डेअरीच्या मालन नायकू म्हणाल्या, "ही कुत्री भटकी आहे, पण रोज आमच्या दारात येते. भाकरी खाते, तिच्या पिलासोबत इथचं सावलीत खेळायची. परवा एका गाडीखाली पिलू आल्यापासून ती चिडलीय. गाड्यांच्या मागे धावते, भुंकते, रडते. गाडीवाले भराट्यानं जाताना एखादा जीव चिरडतात, पण त्या मुक्‍या प्राण्याचं हाल बघवत नाही.''

सोलापूर - आसरा चौकातील चंद्रभागा दूध डेअरीजवळील एक कुत्री त्या भागात सध्या चर्चेचा विषय आहे. ही कुत्री दिसेल त्या गाडीमागे धावत सुटते. कुणाला चावत नाही, पण संताप व्यक्त करते. गाडी दूर गेली की मागे फिरते. काही दिवस तिच्या डोळ्यातून अश्रू गळायचे. 

ही अशी का करते, या प्रश्‍नाचे उत्तर चार दिवसांपूर्वी तेथेच झालेल्या अपघातात सापडते. एका दुचाकीने या कुत्रीचे अडीच महिन्याचे पिलू चाकाखाली चिरडून टाकले, तेंव्हापासून ती अस्वस्थ आहे. प्रत्येक दुचाकीमागे धावून ती "तूच खुनी आहेस', असा आरोप करत असावी, असेच चित्र आहे. तेथील काही नागरिकांनी तिच्या मनातील वेदना जाणल्या, त्या इतरांनाही सांगितल्या, त्यामुळे तिच्याविषयी करुण भावना निर्माण झाली आहे. कुणी त्या कुत्रीवर दगड भिरकावत नाही की ओरडत नाही. 

चारएक दिवसांपूर्वी आरसा चौकातील पुलाजवळ उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुत्र्याचे पिलू दुचाकीच्या चाकाखाली येऊन मेले. त्या पिलाची आई असलेली ही पांढऱ्या रंगाची कुत्री ते पाहतच होती. डोळ्यासमोर पिलाचा जीव गेल्यापासून ती कमालीची अस्वस्थ आहे. प्रत्येक दुचाकीचा पाठलाग करून ती जणू संताप व्यक्त करतेय. "चंद्रभागा'समोर गेले तीन-चार दिवस न चुकता हा प्रकार सुरू आहे. भटक्‍या कुत्र्यांविषयी कितीही संताप, राग, चीड असले तरी त्यातील एखादी करुण कहाणी सर्वसामान्य माणसाचे हृदय पिळवटून टाकते. ही गोष्ट ज्याला समजते, तो तिच्याकडे करूण भावनेने पाहतो. तिच्यातील आईबद्दल सहवेदना व्यक्त करतो. 

बिचारीचं वाईट वाटतं
या घटनेच्या साक्षीदार असलेल्या चंद्रभाग डेअरीच्या मालन नायकू म्हणाल्या, ""ही कुत्री भटकी आहे, पण रोज आमच्या दारात येते. भाकरी खाते, तिच्या पिलासोबत इथचं सावलीत खेळायची. परवा एका गाडीखाली पिलू आल्यापासून ती चिडलीय. गाड्यांच्या मागे धावते, भुंकते, रडते. गाडीवाले भराट्यानं जाताना एखादा जीव चिरडतात, पण त्या मुक्‍या प्राण्याचं हाल बघवत नाही.''

Web Title: stray dog story in Solapur

टॅग्स