एकाग्रतेसाठी करायचं काय? 

रवींद्र खैरे  r.s.khaire@gmail.com 
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही केवळ चंचल स्वभावामुळे दृष्टिक्षेपात आलेल्या यशाची संधी दवडलेले अनेक जण तुम्ही पाहिले असतील. उत्कृष्ट करिअर, चांगली प्रतिष्ठा, आर्थिक स्वातंत्र्य यामुळे बरेच जण स्पर्धा परीक्षेसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात येतात. एक दिवस आपल्याही दारात लाल दिवा असेल. हे स्वप्न बाळगून अभ्यासही करतात; पण एकाग्रता, सहनशीलता, मार्गदर्शनाच्या अभावामुळे हे स्वप्न धुसर होत जाते. अशा मुलांचा प्रश्‍न असतो या एकाग्रतेसाठी करायचे काय? 

कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही केवळ चंचल स्वभावामुळे दृष्टिक्षेपात आलेल्या यशाची संधी दवडलेले अनेक जण तुम्ही पाहिले असतील. उत्कृष्ट करिअर, चांगली प्रतिष्ठा, आर्थिक स्वातंत्र्य यामुळे बरेच जण स्पर्धा परीक्षेसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात येतात. एक दिवस आपल्याही दारात लाल दिवा असेल. हे स्वप्न बाळगून अभ्यासही करतात; पण एकाग्रता, सहनशीलता, मार्गदर्शनाच्या अभावामुळे हे स्वप्न धुसर होत जाते. अशा मुलांचा प्रश्‍न असतो या एकाग्रतेसाठी करायचे काय? 

क्षमता असूनही केवळ मानसिक आंदोलने यशस्वीपणे हाताळायची कला नसल्याने मन अभ्यासात एकाग्र करता येत नाही. म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याअगोदर विद्यार्थांनी मनाची एकाग्रता म्हणजे काय, ती कशी वाढवता येते याचा अभ्यास करायला हवा. स्वतःच्या बऱ्या-वाईट सवयी जाणून घेऊन त्या सवयीत सुधारणा करायला हवी. विषयातील रुची व अभिरुची समजून घ्यायला हवी. मनाच्या अफाट सामर्थ्याची प्रचीती योग्य वेळी आल्यास यश टप्प्यात येते. 
आपल्याला हव्या त्या विषयावर हवे तेव्हा लक्ष केंद्रित करता येणे आणि नको असलेल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता येण्याची कला म्हणजे एकाग्रता होय. स्पर्धा परीक्षेसारख्या आव्हानात्मक क्षेत्राला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थांना मनाची एकाग्रता वाढवण्यासाठीच्या काही टिप्स 
- केवळ परीक्षा हा उद्देश ठेवून अभ्यास करत असाल तर मन अभ्यासात रमणार नाही. अभ्यासाचा मुख्य उद्देश हा ज्ञान मिळवणे हा असला तरच अभ्यास ही आनंद निर्मितीची प्रक्रिया होते. ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करताना आपण एकाग्र होतो आणि अभ्यास हा आनंदाचा डोह होतो. 
- प्रत्येक दिवसाच्या अभ्यासाचे छोटे-मोठे उद्दिष्ट ठरवून घ्या. ठरलेल्या वेळात ते उद्दिष्ट पूर्ण करा. ठरवलेला अभ्यास वेळेत पूर्ण झाल्यास स्वतःच स्वतःला बक्षीस द्या. 
- बरेच जण अभ्यास करताना डोक्‍यात यशापयशाचाच विचार घोळत बसलेले असतात. ज्यांना अपयशाची भीती वाटत असते असे विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता निर्माण करू शकत नाहीत. अशी समस्या असणाऱ्या मुलांनी केवळ वर्तमानकाळाच्या योजना आखाव्यात. आजच्या तासाचा, दिवसाचा विचार करा, जी व्यक्ती वर्तमानकाळाचा पुरेपूर वापर करते तिच भविष्य घडवते. 
- सतत एकाच विषयाच्या अभ्यासाने एकाग्रता भंगते. ठराविक वेळानंतर अभ्यास विषयात बदल करीत गेल्यास एकाग्रता टिकून राहते. 
- ज्या संकल्पनेचा अर्थच कळत नाही अशा संकल्पनेचा अभ्यास करताना मन एकाग्र होत नाही. म्हणून अशा संकल्पना वास्तवातील अनुभवाशी जोडण्याची सवय लावून घ्या. 
- प्रत्येकाचा दिवसातला एक प्राइम टाइम असतो. त्या प्राइम टाइमला अभ्यास केल्यास मनाची एकाग्रता अधीक असते. असा प्राइम टाइम प्रत्येकाने शोधावा व त्याचा पुरेपूर वापर करावा. 
- ध्यान, प्राणायाम, स्वसंमोहन यांचाही मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी फायदा होतो. मनाचे सर्व्हिसिंग करणारी ही तंत्र ही आपण समजून घ्यायला हवीत. 
प्रत्येकाने आपली एकाग्रता भंग करणाऱ्या गोष्टीची यादी तयार करावी. अशा गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्यात. उदा. मोबाइल वेड, टीव्ही, फेसबुक, समारंभ, पार्टी, इत्यादी. 
- आजूबाजूच्या वातावरणाचा परिणामही आपल्या एकाग्रतेवर होत असतो; पण जर अभ्यास हा श्‍वासाइतका महत्त्वाचा झाला असेल, तर वातावरण कसेही असले तरी आपली ब्रह्मानंदी टाळी लागते. त्यामुळे वातावरणाला दोष देत बसण्यापेक्षा मनाला दररोज अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगा. 
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील घटनांचा, माणसांचा, कार्यक्रमाचा प्राधान्यक्रम ठरवलाच पाहिजे. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे याचे काही नियम तयार असावेत आणि ते काटेकोर पाळावेत. कारण एखादी छोटी घटनाही आपली एकाग्रता व वेळापत्रक बिघडवू शकते. म्हणून एकाग्रता समजून घ्या, या कौशल्याचा जाणीवपूर्वक विकास करा यशाचे स्वप्न नक्की साकार होईल. 

Web Title: study child