सर्वांगीण विकासामुळे भाजपच सत्तेवर येणार  सुरेश हाळवणकर

संजय खूळ
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

‘गेल्या दोन वर्षांत भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यापुढील काळातही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे. सर्व तालुक्‍यांतून आमच्या भूमिकेला पाठिंबा मिळत आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. या योजना सक्षमपणे प्रत्येक नागरिकापर्यंत पोचविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता महत्त्वाची आहे. ही बाब आता मतदारांनाही समजली आहे. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांना या निवडणुकीत दणदणीत यश मिळून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष प्रथमच भाजपचा होईल,’ असा विश्‍वास आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला.

‘गेल्या दोन वर्षांत भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यापुढील काळातही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे. सर्व तालुक्‍यांतून आमच्या भूमिकेला पाठिंबा मिळत आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. या योजना सक्षमपणे प्रत्येक नागरिकापर्यंत पोचविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता महत्त्वाची आहे. ही बाब आता मतदारांनाही समजली आहे. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांना या निवडणुकीत दणदणीत यश मिळून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष प्रथमच भाजपचा होईल,’ असा विश्‍वास आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला. त्यांच्यासोबत झालेला हा संवाद... 

प्रश्‍न - भाजपच्या या पहिल्याच प्रयत्नाला कसे यश मिळेल, असे वाटते?
उत्तर - जिल्हा परिषदेच्या ३८ आणि पंचायत समितीच्या ७६ जागा आम्ही ‘कमळ’ चिन्हावर लढत आहोत. जिल्ह्यात आमच्या पक्षाचे नेटवर्क तयार झाले आहे. पण इलेक्‍टिव्ह मेरिटचा आधार लक्षात घेऊन आम्ही मित्रपक्षांसोबत आघाडी केली आहे. यामागे ही निवडणूक जिंकणे हाच उद्देश आहे. तसेच केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार लोकहितासाठी काय करत आहे, हे प्रत्येक मतदारापर्यंत पोचविण्यासाठी आम्ही यशस्वी ठरत आहोत. त्यामुळे मित्रपक्षांचे व आमचे सर्व उमेदवार विजयी होतील.

प्रश्‍न - तुमचा प्रचाराचा मुद्दा काय असेल ?
उत्तर - भाजपकडून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. दोन वर्षांत टोलमुक्ती, महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी, शाहू जन्मस्थळ संग्रहालय उभारणी, नृसिंहवाडी कन्यागत महापर्व काळासाठी निधी, रस्ते व पूलबांधणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव स्मारकाचा विकास आराखडा, जलयुक्ती शिवार योजनेसाठी भरघोस निधी, रेल्वे मार्गाला मंजुरी अशी अनेक विकासकामांचा डोंगर गेल्या दोन वर्षांत उभा केला आहे. पायाभूत सुविधा देण्यापासून ते सांस्कृतिक, पर्यटन आदी क्षेत्रांत भरीव काम केले आहे. विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तोच मुद्दा आमच्या प्रचारात असेल.

प्रश्‍न - भाजपमधील इनकमिंगचा कितपत फायदा होईल?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यनेतृत्वावर विश्‍वास ठेवून जिल्ह्यातील अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्याचा फायदा पक्षाला मिळेल. जिल्ह्यात आता भाजप हा एकच पक्ष परिवर्तन करू शकतो, असा विश्‍वास सगळीकडे निर्माण झाला आहे. ग्रामीण भाग सुजलाम्‌ आणि सुफलाम्‌ करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

प्रश्‍न - ग्रामीण भागातील कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहात?
उत्तर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी पाणंद रस्ते झालेले नाहीत. हे रस्ते केले जातील. ग्राम विकास मंत्रालयाच्या माध्यमातून गावातील रस्ते केले जातील. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अनेक गावे, वाड्या, वस्त्या मुख्य रस्त्याशी जोडण्याचे काम केले जाईल. रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यापूर्वी जिल्ह्यासाठी ११० टीएमसी पाणी मिळण्याचा करार झाला आहे. मात्र सध्या १०० टीएमसीच पाणी मिळत आहे. उर्वरित १० टीएमसी पाणीसाठा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातून साडेचार हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल. 

प्रश्‍न - शेतकरी वर्गासाठी कोणती योजना राबविणार?
उत्तर - जिल्ह्यात चांगल्या पद्धतीचा शेतीमाल तयार होतो. मात्र तो योग्य वेळी ग्राहकांपर्यंत पोचत नाही. तसेच शेतकऱ्यांचे व्यापारी वर्गाकडूनही शोषण होते. एकाच वेळी अधिक उत्पादन झाल्यास ती साठवण्याची सोय नाही. ही सोय झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यासाठी मार्केट समितीमध्ये पणन मंत्रालयांतर्गत ‘पीपीपी’ तत्त्वावर कोल्ड स्टोअरेज यंत्रणा राबविण्यावर भर राहील.

प्रश्‍न - स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना सोबत नसल्याबद्दल काय सांगाल?
उत्तर - स्वाभिमानी शेतकरी संघटना चळवळीसाठी तयार झालेली संघटना आहे. राजकीय पक्ष म्हणून ही संघटना कारभार करू शकत नाही. यापूर्वी निवडणुकीत ते आमच्यासोबत आले. राज्यातील सत्तेतही त्यांना सहभागी करून घेतले; मात्र या निवडणुकीत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यातील चांगल्या कारभारामुळे अनेक गट आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे ही संघटना भाजपसोबत असली किंवा नसली तरी काहीच फरक पडणार नाही. शिवसेनेने आत्तापर्यंत केवळ अस्मितेचे राजकारण केले. त्यांच्यासमोर कधीच विकासाचे व्हिजन नव्हते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यासोबत भाजपने युती केली होती. त्यामुळे शिरोळ वगळता या पक्षाबरोबर कुठेही युती केलेली नाही. लोकांना आता विकास हवा आहे. त्यासाठी भाजप कटिबद्ध आहे त्यामुळे शिवसेना सोबत नसल्याचा तोटा होणार नाही.

प्रश्‍न - भाजप आघाडीला कितपत यश मिळेल?
उत्तर - बहुतेक तालुक्‍यांत भाजप व मित्र पक्षांना चांगले वातावरण आहे. करवीर, भुदरगड व राधानगरी तालुक्‍यांत थोडा संघर्ष करावा लागत आहे. पण भाजपला ७० टक्के हमखास यश मिळेल. मित्रपक्षांचे उमेदवार तर इलेक्‍टिव्ह मेरिटमध्ये असल्याने १०० टक्के यश मिळेल. जिल्ह्यात प्रथमच भाजप व मित्र पक्षांच्या माध्यमातून सशक्त पर्याय दिला आहे. त्याला लोक स्वीकारतील. विरोधकांकडे सध्या आश्‍वासक नेतृत्व दिसत नाही. तेच तेच नेतृत्व मतदारांसमोर येत आहे. जनतेला त्यांचा उबग आला आहे.

नमामी पंचगंगा मोहिम राबवणार
पंचगंगा प्रदूषणाबाबत हाळवणकर म्‍हणाले'' जिल्ह्यातील पंचगंगा नदी सध्या प्रदूषित झाली आहे. या प्रदूषित पाण्याचा फटका पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही बसत आहे. पंचगंगा नदी जिल्ह्याची जीवनदायिनी आहे. ती सतत स्वच्छ पाण्याने प्रवाहित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेअंतर्गत साडेचार कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. ‘नमामी गंगा’ धर्तीवर ‘नमामी पंचगंगा’ मोहीम राबवून नदी प्रदूषणमुक्तीवर भर दिला जाईल.

Web Title: suresh halvankar interview