सोलापूर महापालिका निवडणुकीतही सुशीलकुमार शिंदे यांचे कन्याप्रेम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

सोलापूर - एकेकाळी "युनो' व "दिल्लीची संसद' गाजविणारे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कन्याप्रेम पुन्हा उफाळून आले आहे. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदे बुधवारपासून नऊ सभा घेणार आहेत. त्या सभांपैकी तब्बल सहा सभा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात होणार आहेत. त्यामुळे दिल्ली दरबार गाजविणारे हे नेते केवळ शहर मध्य पुरतेच मर्यादित राहणार का? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

शहर कॉंग्रेस कमिटीने आज शिंदे यांना स्टार प्रचारक म्हणून जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या सभांचे वेळापत्रक प्रसारमाध्यमांना दिले. त्यामध्ये नऊ सभांपैकी तब्बल सहा सभा शहर मध्य विधानसभा मतदारसंघात होणार असल्याचे स्पष्ट झाले. सगळ्यात आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिंदे यांची केवळ एकच सभा कस्तुरबा मार्केटसमोरील महापालिकेच्या शाळेत होणार आहे. यावरून शिंदे हे पालकमंत्री देशमुख यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणार नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहर उत्तर मतदारसंघात जवळपास 1 ते 10 प्रभाग आहेत. त्या प्रभागात सभा न घेऊन कॉंग्रेस भाजपला मदत करत आहे का? यासारख्या अनेक प्रश्‍नांवरून तर्क-वितर्क लढविले जात आहेत. शहर मध्य मतदारसंघात येणाऱ्या प्रभागामध्ये जास्त सभा घेऊन 2019 च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम कॉंग्रेसकडून सुरू असल्याचीही चर्चा आहे.