डल्ला मारणाऱ्या पोलिसांच्या घरांवर निलंबनाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कोल्हापूर एलसीबी सांगलीत; निरीक्षकासह सारे अद्याप पसारच

कोल्हापूर एलसीबी सांगलीत; निरीक्षकासह सारे अद्याप पसारच
सांगली - वारणानगर येथे शिक्षक कॉलनीत घरफोडी करून नऊ कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या पोलिसांच्या शोधासाठी कोल्हापूरमधील "एलसीबी'ची टीम आज सांगलीत दाखल झाली. सकाळपासून त्या सहा पोलिसांचा शोध घेण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या दोन अधिकाऱ्यांसह 5 पोलिस कर्मचारी "आऊट ऑफ कव्हरेज' आहेत.

दरम्यान, "एलसीबी'तील सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील या सहा जणांच्या घरांवर निलंबनाच्या नोटिसा आज लावण्यात आल्या. निरीक्षक विश्‍वनाथ घनवट याच्या निलंबनाचा अहवाल आयजी विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. पोलिस वर्तुळात आज सर्वच ठिकाणी या प्रकरणाची उलटसुलट चर्चा सुरू होती.

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत बिल्डिंग नंबर पाचमध्ये मोठी रोकड असल्याची माहिती संचालकाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या मोहिद्दीन मुल्ला याला होती. त्याने तेथून तीन कोटींहून अधिक रकमेवर डल्ला मारला. मिरजेतील दोन पोलिसांना त्याने बुलेटसाठी पैसे दिले. तोदेखील बुलेटवरून फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार तत्कालीन एलसीबीचे निरीक्षक घनवट आणि पथकाने 12 मार्च 2016 रोजी तीन कोटींहून अधिक रोकड जप्त केली.

रकमेचा तपास करताना सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांनी मुल्लाला घेऊन 13 मार्च रोजी वारणानगर येथे घरफोडी करून सहा कोटी रुपयांवर डल्ला मारला. दोन दिवसांनंतर 15 रोजी निरीक्षक घनवट, चंदनशिवेसह तीन कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारल्याची फिर्याद बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून घनवट, चंदनशिवेसह पाच पोलिस पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर एलसीबीची दोन पथके सांगलीत दाखल झाली होती. पाचही पोलिसांच्या घराला कुलूप आढळून आले. परिसरात खबऱ्यांमार्फत चौकशी केली, मात्र सायंकाळपर्यंत एकही पोलिस त्यांच्या ताब्यात आला नाही. पसार असलेल्या पोलिसांच्या निलंबनाच्या नोटिसा मात्र घरावर लावण्यात आल्या. चोरीचा तपास करताना घरफोडी करून 9 कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा संपूर्ण राज्यात डागाळली गेली आहे.

निलंबनाची नोटीस
जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना काल "एलसीबी'तील सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील या सहा जणांचे निलंबन केले. ते पसार असल्याने ती नोटीस त्यांच्या सांगलीतील घरांवर लावण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे, की कोडोली पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिस शिक्षा व अपील नियम 1956 नुसार शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. निलंबित मुदतीत त्यांचे मुख्यालय हे पोलिस मुख्यालय राहील. त्यांनी दररोज राखीव पोलिस निरीक्षक यांना हजेरी देण्याचे बंधनकारक आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.