"स्वाभिमानी' विविध आघाड्या करणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

सांगली - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना वाळवा आणि शिराळ्यात भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी विरोधकांना सोबत घेऊन आघाडी करणार आहे. जिल्ह्यात अन्यत्र कुणाशी बांधिलकी नसून विधानसभा मतदार संघनिहाय सोयीच्या आघाड्या करण्याचे मार्ग मोकळे असल्याची भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी आज "सकाळ'शी बोलताना मांडली.

सांगली - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना वाळवा आणि शिराळ्यात भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी विरोधकांना सोबत घेऊन आघाडी करणार आहे. जिल्ह्यात अन्यत्र कुणाशी बांधिलकी नसून विधानसभा मतदार संघनिहाय सोयीच्या आघाड्या करण्याचे मार्ग मोकळे असल्याची भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी आज "सकाळ'शी बोलताना मांडली.

इस्लामपूर येथे बुधवारी रात्री वाळवा, शिराळा आणि उर्वरित जिल्हा असे नियोजन करण्याबाबत प्राथमिक बैठक झाली. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, शिवसेना नेते पृथ्वीराज पवार यांनी मिरज पश्‍चिम भागातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यात वेगवेगळे पर्याय चाचपण्याचा निर्णय झाला. वाळवा, शिराळ्यासह मिरज, पलूस, जत तालुक्‍यांत संघटना शड्डू ठोकणार आहे. बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी मुख्य टार्गेट राहणार असून त्यासाठी आवश्‍यक तिथे भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेसला साथ देण्याची संघटनेची तयारी आहे. त्यातील काही जागा स्वाभिमानी आपल्या चिन्हावर लढेल, तेथे इतरांची साथ घेऊ, असेही श्री. शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यासाठी प्राथमिक चर्चांचे फेर सुरू झाले आहेत.

इस्लामपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि 13 जागांवर विजय मिळवणाऱ्या विकास आघाडीचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्‍यात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप एकत्र आल्यास गणित चांगले जमून येईल, असा विश्‍वास नेत्यांना आला आहे. त्यात हुतात्मा आघाडीला सोबत घेतले जाऊ शकते. वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी मुख्य स्पर्धक असेल, तेथे गणित वेगळे राहील, असे खासदार शेट्टींनी स्पष्ट केले. आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह प्रमुख नेत्यांनी त्यासाठी आखणी सुरू केली आहे. या ठिकाणी "इस्लामपूर नगरपालिका पॅटर्न' राबवला जाणार आहे.

जिल्ह्यात अन्यत्र सांगली बाजार समितीप्रमाणे राष्ट्रवादी विरोधकांनी एकत्र केले जाईल, त्यासाठी आवश्‍यक तेथे कॉंग्रेस, शिवसेना, रासप आदींसोबत जुळवून घेण्याची तयारी संघटनेने केली आहे. वसंतदादा समर्थक गटाने कॉंग्रेसपासून फारकत घेऊन स्वतंत्र लढण्याची तयारी केल्यास "स्वाभिमानी'ला ते सोबत घेऊ शकतील. येथे भाजपने संघटनेला महत्त्व दिले नाही तर या गटासोबत हातमिळवणी करण्याचे मार्ग मोकळे असतील. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी कॉंग्रेसमधील गटबाजीत स्वतंत्र आघाडीची चाचपणी सुरू केल्याने हे नवे समीकरण जुळू शकेल. कवठेमहांकाळसह मिरज पूर्व भागात तोलामोलाची ताकद असलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे हे बेरजेत असू शकतील. सांगली बाजार समितीत हाच पॅटर्न आहे.

शेट्टी "ओपन', सदाभाऊ "क्‍लोज'
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कुणासोबत आघाडी करायची याविषयी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका खुली आहे. काही ठिकाणी कॉंग्रेससोबत हातमिळवणी करून राष्ट्रवादीला चित करण्याचा त्यांचा डाव असेल, मात्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत सरकारमध्ये असल्याने त्यांची अडचण होणार आहे. तसे भाजपचे आणि "स्वाभिमानी'चे सख्य येथे संपल्यातच जमा आहे.