गुरुजी... तुम्हीसुद्धा!

Teacher
Teacher

‘नेहमी खरे बोलावे’चा मूल्यसंस्कार देणारे अनेक गुरुजी बोलतात एक अन्‌ वागतात एक. त्याचे खूप किस्से शिक्षकांच्या सुनावणीदरम्यान ऐकण्यास मिळाले. बदलीसाठी कित्येक मास्तर सभागृहातच ‘एसटीने प्रवास’ करू लागले, अपंगत्व दाखविण्यासाठी कोणी लंगडू लागले, काहींनी चेहरे रडवेले बनविले, आरोप तर रेटूनच केले, बदल्यांची माहिती भरताना ‘अंदाजपंचे धागोदर्शे’चा कार्यक्रम केल्याची कबुलीही काहींनी दिली. हे सारे पाहून...‘गुरुजी, तुम्हीपण...असं करताय?’ हा प्रश्‍न उभा राहिला.

संस्कारदाता शिक्षक योग्यच माहिती भरणार, असा विश्‍वास कदाचित ग्रामविकास विभागाला असावा. म्हणूनच तर बदलीची ऑनलाइन प्रक्रिया राबविली गेली. मात्र, निवडणुकांप्रमाणे काही शिक्षकांनी राजकारण केले.

सोयीस्करपणे संघटनांचा वापर झाला, तर सोईंसाठी संघटनाही उभ्या केल्या. अनेक शिक्षक त्याला अपवादही आहेत. खुल्या मनाने त्यांनी मिळेल त्या शाळा स्वीकारल्या अन्‌ आपले कर्तव्य बजावत कर्तृत्व उभे करणे सुरू केले. 
शासकीय, प्रशासकीय पातळीवर बदली प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिल्या, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यात बदलही झाले पाहिजेत. त्यापुढे कायदे, नियमांचा गैरफायदा घेणाऱ्या शिक्षकांवरही कायद्याचा आसूड ओढला पाहिजे. शिक्षक बॅंकेच्या सभेतच आजपर्यंत शिक्षकांतील भांडणे, खालच्या पातळीवरील आरोप निदर्शनास येत होते. आता ते चक्‍क जिल्हा परिषदेच्या सभागृहात पोचले. २७५ शिक्षकांच्या तक्रारींवर ‘इन कॅमेरा’ सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान बदली प्रक्रियेतील प्रमुख त्रुटी पुढे आल्या. संवर्ग दोनमधील पती-पत्नीच्या शाळांतील अंतर मोजण्याच्या परिमाणाची गणितेही रंगली. तक्रारदाराने गुगल मॅपद्वारे मोजले, संबंधित शिक्षकाने स्वत:च्या वाहनाचे अथवा एसटी महामंडळाच्या कार्यालयाकडील अंतर दिले, तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत मोजलेले अंतर दिले. विशेष म्हणजे तिघांचे अंतर वेगवेगळे होते. अनेक शिक्षक जवळच्या मार्गावरून एसटी बस जात नाहीत, असे सांगून लांबचे अंतर सांगत होते. ‘एसटी’ची पायरी न चढणाऱ्या शिक्षकांनाही एसटीच्या फेऱ्यांचा पुळका आला. स्वत:च्या चारचाकी, दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या शिक्षकांनी ‘साताऱ्याहून वाईमार्गे खंडाळा’ असा प्रवास दाखविला. 

अपंगत्व दाखविण्यासाठी सभागृहात लंगडत चालणे, शासनाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असतानाही अपंग शिक्षकांची चेष्टा करणे या बाबी सुजाण शिक्षकांना शोभणाऱ्या नव्हत्या. काहींनी दुर्गम शाळांत काम केले नसतानाही चुकीची माहिती भरली. त्यात कोणताही पुरावा न देता ‘अपंगत्वाचा दाखला ५० हजारांत मिळतो,’ हा व्यवस्थेवर केलेला आरोप म्हणजे कहरच. बोगस माहिती भरणाऱ्यांचा भांडाफोड केला पाहिजे, याला सर्वांचा पाठिंबा आहे. पण, स्वत:च्या फायद्यासाठी नियमांचा केलेला दुरुपयोग, दुसऱ्यांवर केलेले आरोप, खातरजमा न करता केलेली तक्रार, हे शिक्षकी पेशाला नक्कीच शोभणारे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com