ट्रकचालकाला लुटणाऱ्या  साताऱ्यातील तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

नागठाणे - पुणे-बंगळूर महामार्गावरून निघालेल्या मालट्रकच्या चालकाला मारहाण करून त्याच्याकडील 20 हजार रुपये चोरणाऱ्या तिघांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. घटनेनंतर केवळ पाच तासांतच पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केले. शनिवारी रात्री काशीळजवळ (ता. सातारा) लुटमारीची ही घटना घडली. 

पोलिसांनी सांगितले, की शैलेश काशिनाथ पवार (वय 26, रा. गुरुवार पेठ, सातारा), नीलेश जगन्नाथ कदम (वय 24, रा. मूळ परमाळे, हल्ली गुरुवार पेठ, सातारा) व आकाश दिलीप शिंदे (वय 19, रा. गीते बिल्डिंगजवळ, पंतांचा गोट, सातारा) अशी या चोरट्यांची नावे आहेत. एक जण पोलिसांना सापडला नाही. 

इसाकअहमद अब्दुल करीमसाहब गुत्तेवारी (रा. बेळगाल पेठ, जि. हवेरी, कर्नाटक) हा मालट्रक घेऊन म्हैसूर (कर्नाटक) येथे निघाला होता. त्याच्यासोबत बदली चालकही होता. शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास महामार्गावरील काशीळ गावच्या हद्दीत एका मारुती व्हॅनने त्यांच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. मोठा आवाज आल्यामुळे चालकाने ट्रक बाजूला घेऊन थांबवला. याचवेळी व्हॅनमधून उतरलेल्या चौघांनी ट्रकचालकाशी हुज्जत घालत नुकसानभरपाई म्हणून 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर दोघांनाही लोखंडी सळी व हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यांनी या दोन्ही चालकांकडे असणारी सुमारे 12 हजारांची रक्कम तसेच मोबाईल व अन्य साहित्य असा सुमारे वीस हजारांचा मुद्देमाल काढून घेतला. मग व्हॅनसह तेथून पलायन केले. 

या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना मारुती व्हॅनची नंबरप्लेट घटनास्थळी सापडली. सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर, उपनिरीक्षक बी. जी. होळकर, पोलिस कर्मचारी मानसिंग शिंदे, डी. जी. शिंदे, दीपक जाधव, सुनील जाधव, समाधान राक्षे, डी. डी. जाधव यांनी सूत्रे हलवत व्हॅन शोधून काढली. यावेळी शैलेश पवार, नीलेश कदम व आकाश शिंदे यांनाही शिताफीने ताब्यात घेतले. एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर करत आहेत.