चार हजाराला तब्‍बल तीनशे रुपये कमिशन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - नोटा बदलण्यासाठी बॅंकेच्या रांगेत बसा आणि चार हजाराला तीनशे रुपये कमिशन मिळवा, असा नवा फंडा काहींनी शोधून काढला आहे. यासाठी परिसरात राहणाऱ्या तरुणांना एकत्र करून त्यांचे ओळखपत्र घेतले जात आहे. याशिवाय काही मोठ्या कंत्राटदारांनी आपल्या कामगारांना प्रत्येकी चार हजार रुपये देऊन रांगेत उभे केले आहे. 

कोल्हापूर - नोटा बदलण्यासाठी बॅंकेच्या रांगेत बसा आणि चार हजाराला तीनशे रुपये कमिशन मिळवा, असा नवा फंडा काहींनी शोधून काढला आहे. यासाठी परिसरात राहणाऱ्या तरुणांना एकत्र करून त्यांचे ओळखपत्र घेतले जात आहे. याशिवाय काही मोठ्या कंत्राटदारांनी आपल्या कामगारांना प्रत्येकी चार हजार रुपये देऊन रांगेत उभे केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० व १००० च्या चलनी नोटांवर बंदी आणली. तेव्हापासून ३० डिसेंबरपर्यंत प्रत्येकी चार हजार रुपये बदलून देण्याची व्यवस्था सर्वच बॅंकांत करण्यात आली आहे. त्यामुळे बॅंकेच्या बाहेर सर्वसामान्य ग्राहकांच्या रांगाच रांगा दिसत आहेत. बॅंकांनीही शनिवार, रविवारची सुटी रद्द करून पैसे देण्याची व्यवस्था केली आहे.

प्रत्येकी चारच हजार दिले जात असल्याने ज्यांच्याकडे ५०० व १००० च्या जादा नोटा आहेत त्यांच्याकडून रोज वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. 
काल एका नगरसेविकेच्या पतीने भागातील मुलांनाच आपले अधिकृत ओळखपत्र घेऊन बोलावून घेतले. एका बॅंकेच्या दारात स्वतः एका चारचाकी गाडीत बसून या मुलांना प्रत्येकी चार हजार रुपये देत त्यांना रांगेत उभे केले जात होते. या बदल्यात त्या प्रत्येक मुलाला तीनशे रुपये कमिशनही दिले जात होते. दिवसभर कष्टाचे काम करूनही मिळणार नाहीत ते ३०० रुपये बॅंकेच्या रांगेत तास दीड तास उभे राहून मिळत असल्याने पैसे भरण्यासाठी या महाशयांकडे तरुणांची रांग लागली. ज्या बॅंकेच्या दारात हा प्रकार सुरू होता, त्या बॅंकेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर बॅंकेनेही पैसे संपल्याचे कारण सांगून हा प्रकार बंद पाडला. 

दिवसभर चर्चा
सेंट्रिंग कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. शनिवार हा या कामगारांच्या पगाराचा दिवस; पण ५०० व १००० च्या नोटांमुळे हा पगार देणे शक्‍य नाही. यावर मार्ग काढण्यासाठी कंत्राटदारांनी या कामगारांनाच या नोटा देऊन त्यांना बॅंकेच्या रांगेत ओळखपत्रासह उभे करण्याचा प्रकार काल घडला. रोज वेगळी शक्कल पैसे काढण्यासाठी लढवली जात आहे. याची खमंग चर्चा दिवसभर कोल्हापुरात सुरू आहे.