सातारा पालिका हद्दवाढीवर एकूण 33 हरकती दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

जिल्हाधिकाऱ्यांपुढे होणार सुनावणी; शाहूपुरीतून विरोध

जिल्हाधिकाऱ्यांपुढे होणार सुनावणी; शाहूपुरीतून विरोध
सातारा - सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या अनुषंगाने आजअखेर एकूण 33 हरकती दाखल झाल्या. या हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणी होईल. त्यानंतर पालिका, भूमी अभिलेख विभागाच्या अभिप्रायासह जिल्हाधिकारी शासनाकडे शिफारस करतील. त्यानंतर अंतिम अधिसूचना निघाल्यानंतर सातारा पालिकेच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब होईल.

सातारा शहराच्या हद्दवाढीची प्रारंभिक अधिसूचना 2001 मध्ये निघाली होती. त्यास दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्याने शासनाने 22 मार्च 2017 रोजी नव्याने प्रारंभिक अधिसूचना काढून सातारा पालिकेच्या हद्दवाढीचा इरादा व्यक्त केला होता. शाहूपुरी, करंजे, दरे खुर्द, शाहूनगर, गोडोली, पिरवाडी, तसेच शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा वेण्णा नदीपासून शिवराज पंपापर्यंतचा पश्‍चिम भाग अजिंक्‍यतारा किल्ल्यासह पालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत आहे.

अधिसूचना निघाल्यानंतर एक महिन्यात त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत होती. ही मुदत आज संपली. एकूण 33 हरकती दाखल झाल्या. त्यामध्ये शाहूपुरीतील बहुतांश गृहनिर्माण संस्थांनी पालिका हद्दीत समाविष्ट होण्यास विरोध नोंदवत नगरपंचायतीची मागणी केली.

विलासपुरातील दोन नागरिकांनी याच पद्धतीचा आक्षेप नोंदवला आहे. अस्लम तडसकर, विक्रांत पवार, विजय कदम यांनी संयुक्‍तपणे हरकत नोंदवली. त्यात त्यांनी पालिकेच्या हद्दवाढीऐवजी विस्तारित भागात न्यू सातारा नागरी विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी केली. खेड येथील पाच नागरिकांनी आपल्या सर्व्हे क्रमांकालाही पालिका हद्दीत समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे.

दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेतात. नागरिकांची हरकत सविस्तर ऐकून घेतल्यानंतर त्यावर पालिका मुख्याधिकारी व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला जातो. त्यावर जिल्हाधिकारी हद्दवाढीच्या अनुषंगाने आपली शिफारस शासनाकडे करतात. त्यानंतर हद्दवाढीबाबत अंतिम अधिसूचना शासन जारी करते. त्यानंतर हद्दवाढीवर शिक्कामोर्तब होईल.

आणखी हद्द वाढवण्याची "क्रेडाई'ची मागणी
बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या साताऱ्यातील "क्रेडाई' या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर व उपनगरातील भौगोलिक सलगता व वाढते नागरीकरण लक्षात घेऊन पालिका हद्दीत आणखी काही ग्रामपंचायतींचे क्षेत्र समाविष्ट करण्याची गरज व्यक्त केली. हद्दवाढीच्या प्रस्तावित क्षेत्राबरोबरच कोंडवे, सैदापूर, संपूर्ण खेड, कोडोली या भागाचा पालिका हद्दीत समावेश केल्यास या भागाचा नियोजनबद्ध विकास होईल, असे आग्रही मत त्यात व्यक्त करण्यात आले आहे.