प्रशिक्षणार्थी सैनिकांनी अनुभवला युद्धाचा थरार

दत्ता इंगळे 
बुधवार, 11 जानेवारी 2017

नगर - रणगाड्यांतून सुटणारे तोफगोळे कधी दूरवरील शत्रूच्या ठिकाणांचा, कधी आकाशातील शत्रूंचा वेध घेत होते. सुखोई विमानेही डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच लक्ष्य साधत होते. मेकॅनाइज्ड इंफन्ट्री रेजिमेंटल सेंटर आणि कवचित कौर केंद्र यांच्यातर्फे मंगळवारी येथील के. के. रेंजच्या क्षेत्रावर युद्धसरावाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्या वेळी हा थरार पाहून प्रशिक्षणार्थी सैनिक आणि आर्मी स्कूलचे विद्यार्थी व अधिकारी भारावून गेले होते.

तोफगोळ्यांद्वारे काही किलोमीटरवरील लक्ष्य अचूक टिपणारे रणगाडे, सुखोई विमाने व हेलिकॉप्टरद्वारे दाखविण्यात आलेली प्रात्यक्षिके, सैनिकांची चपळता, हे सारे पाहताना प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येत होता. यातून लष्कराच्या ताकदीचे दर्शन घडले. विविध रणगाड्यांनी तोफगोळ्यांद्वारे लांब पल्ल्याच्या लक्ष्यांचा वेध घेतला. या सरावात "टी-90' रणगाडा प्रमुख आकर्षण होता. तसेच अर्जुन, भीष्म टी-905, रशियन टी-72, बीएमटी-2, सीएमटी या रणगाड्यांची माहितीही या वेळी देण्यात आली.

सुमारे दीड तास चाललेल्या या युद्धसराव प्रात्यक्षिकांमध्ये पहिल्या भागात इंफन्ट्री कॉम्बॅट व्हेइकल तथा हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरची तांत्रिक सिद्धता दाखविण्यात आली. दुसऱ्या भागात स्थिर आणि गतिशील प्रकारातील फायरिंग व युद्धसरावाने भारतीय लष्कर कोणत्याही युद्धासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. युद्धात वापरायच्या साहित्याचे प्रदर्शनही या वेळी भरविण्यात आले होते. या वेळी कवचित कौर केंद्र तथा मेकॅनाइज्ड इंफन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे मेजर जनरल प्रवीण दीक्षित व ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रह्मण्यम यांनी युद्धसराव आणि लष्कराच्या तयारीबाबतची माहिती दिली.