आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत- उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

हा पूर्वनियोजित कट - शिवेंद्रसिंहराजे 
प्रचार सभेमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी वसंतराव मानकुमरे यांना धमकी दिली होती. त्यानुसार त्यांना मारण्याचा पूर्वनियोजित कट करूनच ते आज खर्शी-बारामुरे येथे आले व त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेला हा हल्ला पाहून तेथे उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून दगडफेक केली गेली. त्यांचा जावळीत यायचा संबंध काय? त्यांची उपस्थितीच त्यांचा उद्देश स्पष्ट करते. मारहाण करणारे खासदार व त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढ्यात पत्रकारांशी बोलताना केली.

मेढा/कुडाळ - मुंबईत वाम मार्गाने पैसे कमावून मोठे झालेले गुंड जावळीच्या जनतेवर दहशत माजवत आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे व मानकुमरे यांनी पूर्वनियोजित कट करून हा हल्ला केला आणि माझ्याविरुद्धच खोटी तक्रार देत आहेत. आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत. मी चाल केली, तर अनेकांचा जीव जाईल. ते मला नको आहे.'' त्यांनी खाल्ले म्हणून आपण शेण खायला नको, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. 

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांच्या गटांमध्ये आज मतदान प्रक्रियेदरम्यान राडा झाला. उदयनराजे भोसले यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांनी दगडफेक केली. राष्ट्रवादीचे उमेदवार व शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक वसंतराव मानकुमरे यांच्या पत्नीसह कार्यकर्त्यांना उदयनराजे समर्थकांनी मारहाण केली. या प्रकारामुळे जावळी व सातारा तालुक्‍यांत दुपारनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. मानकुमरे यांच्या फिर्यादीनुसार मारहाण व मंगळसूत्र चोरीबद्दल दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. खासदार गटाची तक्रार नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

खासदार भोसले यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडांनी हल्ला करून दहशत माजविण्याचा प्रकार आज दुपारी खर्शी-बारामुरे (ता. जावळी) येथे घडला. हल्ल्यात उदयनराजे समर्थकांसह एक पोलिस निरीक्षक जखमी झाला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जावळी तालुक्‍यात मतदान शांततेत सुरू होते. मात्र, साडेचारच्या सुमारास खासदार भोसले मतदान केंद्राला भेट देण्यासाठी खर्शी-बारामुरे येथे आले. कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते परतत असताना मानकुमरे यांच्या कार्यकर्त्याने खासदारांच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली. त्यातून वाद निर्माण झाला. उदयनराजेंची गाडी काही अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या, तसेच पोलिस गाडीवर युवकांकडून जोरदार दगडफेक झाली. यामध्ये उदयनराजेंचे कार्यकर्ते, तसेच पोलिस निरीक्षक सुरुंगे जखमी झाले. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांची कुमक घटनास्थळी गेली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर उदयनराजे साताऱ्याकडे गेले. काही वेळाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले घटनास्थळी आले. त्यांनी मानकुमरेंसह करहर पोलिस ठाणे गाठले. तेथे खासदार समर्थकांविरुद्ध त्यांनी तक्रार केली. 

या प्रकारादरम्यानच शिवसेनेचे तालुक्‍यातील युवा नेते राजू गोळे यांच्यावरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तीनही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने करहर व मेढा पोलिस ठाण्याच्या परिसरात जमा झाले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार भोसले व मानकुमरे हे कार्यकर्त्यांसह मानकुमरे पॉइंटवर ठाण मांडून होते. तेथे सहायक निरीक्षक काठाळे तक्रार नोंदवून घेत होते. उदयनराजे समर्थक व शिवेसेना नेत्याची तक्रार मेढा पोलिस ठाण्यात घेण्यात येत होती. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी पोलिस मुख्यालयासमोर हजारोंचा प्रक्षुब्ध जमाव गोळा झाला होता. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व अधीक्षक पाटील यांच्याकडे गेली.

शिवीगाळ व मंगळसूत्र चोरले 
खर्शी- बारामुरे येथील प्रकाराबाबत वसंतराव मानकुमरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास खासदार भोसले, त्यांचे समर्थक गणेश जाधव (रा. केसरकर पेठ), अजिंक्‍य मोहिते, अशोक सावंत, संग्राम बर्गे, किशोर शिंदे, लखन कोटक, जितेंद्र राठोड (रा. सातारा), योगेश गोळे (वालूथ, ता. जावळी), सयाजी शिंदे (आखाडे, ता. जावळी) हे चार ते पाच वाहनांतून आले. या वेळी "मानकुमऱ्या, तुला मस्ती आली आहे काय, माझ्याविरुद्ध भाषण करतोस, इथून निघून जा, नाही तर तुला संपवून टाकीन,' असे उदयनराजे म्हणाले. त्यानंतर गणेश जाधव याने दांडक्‍याने माझ्यावर हल्ला केला. माझी पत्नी मध्ये आली. तिलाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली, तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ केली. अजिंक्‍य मोहिते याने माझ्या पत्नीच्या गळ्यातील आठ तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. माझ्या गाडीची मोडतोड केली व चालक विक्रम शिंदे (रा. आखाडे) याला मारहाण केली. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

हा पूर्वनियोजित कट - शिवेंद्रसिंहराजे 
प्रचार सभेमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी वसंतराव मानकुमरे यांना धमकी दिली होती. त्यानुसार त्यांना मारण्याचा पूर्वनियोजित कट करूनच ते आज खर्शी-बारामुरे येथे आले व त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेला हा हल्ला पाहून तेथे उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून दगडफेक केली गेली. त्यांचा जावळीत यायचा संबंध काय? त्यांची उपस्थितीच त्यांचा उद्देश स्पष्ट करते. मारहाण करणारे खासदार व त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढ्यात पत्रकारांशी बोलताना केली. खासदार भोसले यांच्यापासून माझ्या जिवाला धोका असल्याचे या वेळी श्री. मानकुमरे म्हणाले.