उगवाई मंदिर छान; पण परिसरात घाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

राधानगरी - अभयारण्य परिसरातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये दाजीपूर येथील उगवाई मंदिर परिसर निश्‍चितच रमणीय आहे. येथे यावे आणि निसर्गाच्या प्रेमात पडावे, असे हे सुंदर ठिकाण आहे; मात्र इथे येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांमुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. उगवाई मंदिर छान; पण परिसरात साचलीय घाण, अशी परिस्थिती पुढे येऊ लागली आहे. या परिसराच्या स्वच्छतेची गरज आहे. 

उगवाई मंदिर आणि राधानगरी तलावाचा पाणलोट क्षेत्राचा माळ यामुळे पर्यटकांचा ओढा या परिसरात वाढला आहे. दूरवर पसरलेला राधानगरी धरणाचा प्रचंड जलाशय, त्याची निळाई आणि त्यांच्या सभोवती असलेला जंगल परिसर यांमुळे इथे येणाऱ्याला आपलं जग काही काळ का असेना, विसरायलाच होते; मात्र येणाऱ्या लोकांना सोबत आणलेला कचरा तिथेच टाकण्यात काय आनंद मिळतो, हे त्यांनाच माहीत, अशी स्थिती आहे. यामध्ये पिणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. अनेकजण येतात आणि सोबत आणलेल्या बाटल्यांतील मदिरा पोटात जाताच चित्रपटातले हीरो बनतात आणि तलावाच्या खडकावर बाटल्या फोडण्याचे पराक्रम करतात.

अशीच स्थिती उगवाई मंदिर परिसरात आहे. सह्याद्रीच्या शिखरावर संस्थान काळात उभारलेले मंदिर आणि नयनरम्य परिसर. येथे अनेक स्थानिकांच्या जत्राही येतात आणि वनभोजनेही होतात. यातून मंदिराच्या सभोवती कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत. दारूच्या बाटल्या व प्लास्टिक झाडा-झुडपात अस्तित्व जपून आहेत. हे सारे स्वच्छ करून परिसराचे वैभव वाढवावे लागणार आहे. 

यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’, बायसन नेचर क्‍लब, वन्यजीव व शासकीय विभागाच्यावतीने २७ मे रोजी स्वच्छता मोहीम घेण्यात येत आहे. 

हे आहेत मोहिमेचे शिलेदार
कृष्णकन्हैया मंच सोळांकूर- विजय पाटील व मित्र मंडळ, निवास पाटील -सोळांकूर, स्नेहल माने- कुरुकली, कोनवडेचे कवी गोविंद पाटील, अरविंद सुतार व त्यांचे सहकारी, राजेंद्र चव्हाण, राधानगरी तालुकाध्यक्ष मनसे व त्यांचे सहकारी, नंदकिशोर सूर्यवंशी, पनोरी, राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती गायत्रीदेवी सूर्यवंशी व महिला मंडळ, चरापले ग्रुप - कौलव, अमित बागडी व मित्रमंडळ-आवळी बुद्रुक, जयवंत हावळ व स्वानंद सेवानिवृत्त मंडळ, मुरगूड. 

यांची मदत 
रंगनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. प्रवीण हेंद्रे. 
कै. शेवंताबाई किरुळकर चॅरिटेबल ट्रस्ट- राशिवडे खुर्द.