उजनी उणे नऊ टक्‍क्‍यांवर; सोलापूरसाठी आज पाण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

यापूर्वी मागील वर्षी चार जुलैला धरण उणे 53.43 टक्के इतके झाले होते. यंदा ती पातळी गाठणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण उणे नऊ टक्‍क्‍यांवर आले आहे. धरणातून सध्या उजवा व डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. सोलापूर शहराला पिण्यासाठी उद्या (ता. 8) पाणी सोडले जाण्याची शक्‍यता आहे.

यंदा लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिकारी टीकेचे लक्ष झाले आहेत. 111 टक्के भरलेले धरण आठ महिन्यांतच उणे होण्यामागे अधिकारीच असल्याची टीका लोकप्रतिनिधी करत आहेत. धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी व्यवस्थित न केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. धरण उणेमध्ये गेल्यानंतर सिंचनासाठी पाणी सोडता येणार नसल्याचे कारण सांगणारे अधिकारी आता याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत.

नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सोमवारी सोलापूर शहराला पिण्यासाठी नऊ हजार क्‍युसेक इतक्‍या प्रचंड वेगाने पाणी भीमा नदीत सोडण्याचा निर्णय झाला आहे. जास्त वेगाने पाणी सोडले तर ते लवकर औज बंधाऱ्यात पोचण्यास मदत होणार आहे. भीमा नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर धरण उणे 20 टक्‍क्‍यांपर्यंत जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
यापूर्वी मागील वर्षी चार जुलैला धरण उणे 53.43 टक्के इतके झाले होते. यंदा ती पातळी गाठणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.