उजनीच्या पाणीसाठ्यात 15 टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सोलापूर - पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 15.3 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. जरी उजनी धरणातील पाणीसाठा वाढला असला, तरी सोलापूर जिल्हा मात्र पावसाअभावी अद्यापही तहानलेलाच आहे.

सोलापूर - पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 15.3 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. जरी उजनी धरणातील पाणीसाठा वाढला असला, तरी सोलापूर जिल्हा मात्र पावसाअभावी अद्यापही तहानलेलाच आहे.

पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झाला व त्याचा फायदा उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी झाला आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत होता, त्या वेळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. मात्र, शेतकऱ्यांनी वाट पाहूनही पाऊस पडलाच नाही. शेतामध्ये असलेल्या ओलीतावर पेरणी केलेले धान्य उगवले आहे. मात्र, पाऊस नसल्याने ते आता करपू लागले आहे.

उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा वजा 53.43 टक्के इतक्‍या नीचांकी पातळीवर गेला होता. त्यामध्ये चार जुलैपासून सुधारणा होऊ लागली आहे. आज सकाळी सहापर्यंतच्या आकडेवारीनुसार धरणाची पाणीपातळी वजा 38.13 टक्‍क्‍यांवर आली आहे. म्हणजेच दहा दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात 15.3 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. धरणातील आजचा उपयुक्त पाणीसाठा वजा 20.43 टीएमसी, तर एकूण पाणीसाठा 43.23 टीएमसी इतका आहे. सकाळी सहा वाजता दौंड येथून 16 हजार 867 क्‍युसेक पाणी धरणात मिसळत होते.

आठ टीएमसी पाणी वाढले
गेल्या दहा दिवसांत धरणात 8.2 टीएमसी पाणी वाढले आहे. मात्र, आता पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणाची पाणीपातळी स्थिर राहण्याची शक्‍यता आहे.