अपूर्ण योजनेमुळे पाण्यासाठी वणवण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

सातारकरांची देव देतो अन्‌ दैव नेतं अशी अवस्था; 30 टक्के लोकसंख्येला जुन्या व्यवस्थेतूनच पाणी
सातारा - अर्धा अब्ज रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. आजही ही योजना अपुरी असून काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील 30 टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्येला जुन्या व्यवस्थेतूनच पाणी भरावे लागत आहे. देव देतो आणि दैव नेतं, अशी काहीशी अवस्था सातारकरांची झाली आहे.

सातारकरांची देव देतो अन्‌ दैव नेतं अशी अवस्था; 30 टक्के लोकसंख्येला जुन्या व्यवस्थेतूनच पाणी
सातारा - अर्धा अब्ज रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. आजही ही योजना अपुरी असून काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील 30 टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्येला जुन्या व्यवस्थेतूनच पाणी भरावे लागत आहे. देव देतो आणि दैव नेतं, अशी काहीशी अवस्था सातारकरांची झाली आहे.

सातारा शहराची 2040 ची लोकसंख्या गृहित धरून या लोकांना पुरेल इतके पाणी पुरविण्याची व्यवस्था असणारी सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाने 24 बाय 7 या योजनेकरिता 50 कोटी रुपयांचा निधी दिला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनेचे जमेल तेवढे वाटोळे करत सातारकरांवर पश्‍चात्तापाची वेळ आणली. प्राधिकरणाचा जावई असलेल्या ठेकेदाराने काम सुरू करायला दोन वर्षे घालवली. त्यानंतर जमेल तसे काम करत 18 महिन्यांत पूर्ण करायच्या योजनेसाठी 5 वर्षे घालवली. शहराच्या डोंगरी भागात अद्याप लाइन टाकून नागरिकांना नव्या योजनेचे पाणी द्यायचे आहे. रामाचा गोट, प्रतापगंज पेठ, सोमवार, बुधवार, शुक्रवार पेठ, करंजे या पेठांमधील काही भागात आजही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पालिका मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर असलेल्या कुंभारवाड्यातील आजही लोक नळांना मोटारी लावून पाणी खेचताना दिसतात. साताऱ्यातील पाणीप्रश्‍न सुटला, असे छातीठोक सांगणाऱ्यांसाठी हे बोलके उदाहरण आहे.

सदरबझार, गोडोली या शहराच्या पूर्व भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याचा खेळखंडोबा चालविला आहे. लोकांना पुरेसे पाणी नाही; पण रस्त्यावरून पाणी धो धो वाहत आहे. नागरिकांना अव्वाच्या सव्वा पाणी बिले भरावी लागत आहेत. दुसऱ्या बाजूस धनदांडगे थकबाकी ठेवून प्राधिकरणाला चुना लावत आहेत. प्राधिकरणाच्या या कारभारावर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिलेला नाही. सुधारित योजनेच्या खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था वाईट होती. लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा करून रस्त्यांसाठी विशेष अनुदाने आणली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारला आहे. प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची बऱ्यापैकी कामे झाली आहेत.

प्रश्‍न सुटला, मग तीन टाक्‍या कशासाठी ?
2040 म्हणजे पुढील 30 वर्षांचे नियोजन करून योजना आखली असताना साठवण टाक्‍या अपुऱ्या पडत असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला आहे. आता अमृत योजनेतून करंजे, कात्रेवाडा व माची पेठेत नव्या टाक्‍यांच्या उभारणीचे नुकतेच नारळ फुटले आहेत. शहराचा 30 टक्के भाग अजूनही पुरेशा पाण्यापासून वंचित आहे. या नागरिकांना जुन्या व्यवस्थेतून पाणी घ्यावे लागत आहे. जनतेच्या खिशातून गोळा होणाऱ्या करातून पाण्यासारखा पैसा वाया गेला. एवढं करूनही सातारकरांना पुरेसे पाणी नाही ते नाहीच.

टॅग्स