उर्दूतील पहिले 'टॅब स्कूल' सोलापुरात

विजयकुमार सोनवणे 
रविवार, 2 एप्रिल 2017

लोकवर्गणीतून साकारले महापालिका शिक्षकांचे स्वप्न

लोकवर्गणीतून साकारले महापालिका शिक्षकांचे स्वप्न
सोलापूर - स्पर्धात्मक युगात अत्यावश्‍यक बनलेल्या "टॅब'चे आकर्षण अगदी मोठ्यांपासून सर्वांना असते; मात्र शालेय जीवनातच वह्या-पुस्तकांऐवजी टॅबद्वारे शिकण्याची संधी भांडी घासणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार आहे. हा योग जुळवून आणला सोलापुरातील महापालिका उर्दू शाळा क्र. 3 मधील शिक्षकांनी आणि तोही लोकवर्गणीच्या माध्यमातून. राज्यातील उर्दू माध्यमाचे पहिले "टॅब स्कूल' सुरू करण्याचा मान या शाळेला मिळाला आहे, असा दावा करण्यात आला.

गरीब कुटुंबांत मजुरीसाठी आई-वडील सकाळीच बाहेर पडल्यामुळे घरातील कामे करण्याची जबाबदारी मुलांवर येते. त्यांच्या शिक्षणाकडेही कोणी गांभीर्याने पाहात नाही. वेळेवर शाळा नाही, पुस्तके नाहीत. अशा स्थितीत शिकण्याची इच्छा असली तरी शाळेत जायची संधी नाही.

शिक्षणासाठी लागणारे साहित्य कोण देणार, हाही प्रश्‍न असतो; मात्र महापालिका शाळांमध्येही "टॅब' शिक्षण पोचत असल्याने गरीब आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित मुलेही आता खासगी शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणे "डिजिटल' शिक्षण घेतील. भांडी घासणारे चिमुकले हात आता सफाईदारपणे संगणक हाताळणार आहेत. संगणकावर चित्रे काढणे, पुस्तकातल्या गोष्टी दृश्‍य स्वरूपात पाहणे, कोडी सोडविणे, गणिताचा अभ्यास करण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

या महापालिका उर्दू शाळेची पटसंख्या फक्त 20 होती. मुख्याध्यापिका निलोफर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी खडतर प्रयत्न करत ती 87 वर पोचविली. त्यांची चिकाटी पाहून अनेकांनी स्वतःहून आर्थिक मदत केली. काही रक्कम शिक्षकांनी स्वतः घातली. स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या "टॅब स्कूल' उपक्रमाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 3) होत आहे.

स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी "डिजिटल' स्कूलची गरज होती. महापालिका शाळेतील मुलांनाही अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. त्यास समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली आणि आमचे स्वप्न पूर्ण झाले.
- निलोफर शेख, मुख्याध्यापिका महापालिका उर्दू शाळा क्रमांक तीन, सोलापूर

Web Title: urdu first tab school in solapur