बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ

आयाज मुल्ला
बुधवार, 5 जुलै 2017

खटाव तालुक्‍यातील बाजारपेठांत शुकशुकाट; गेल्या दोन वर्षांतील तोट्याचा परिणाम

वडूज - गेल्या दोन वर्षांत उत्पादित बटाट्याच्या पिकाला मिळालेला निचांकी दर, नोटाबंदीमुळे काहीशी अडचणीत आलेली बॅंकिंग व्यवस्था आणि कर्जमाफीच्या कचाट्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून केवळ दहा हजार रुपयांचे पीक कर्ज दिले जात असल्याच्या कारणांमुळे खटाव तालुक्‍यात यावर्षी बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. संपूर्ण जिल्ह्यात बटाट्याचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या या तालुक्‍यातील ठिकठिकाणच्या बटाटा बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट दिसत आहे. 

तालुक्‍यातील पुसेगाव, वडूज, पुसेसावळी, औंध, म्हासुर्णे अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या बाजारपेठांतून बटाटा बियाण्यांना मागणी असते. त्यामुळे या भागांतील शेतकरी अगोदरच व्यापाऱ्यांकडे आपल्या बियाण्यांची आगाऊ नोंदणी करून ठेवतात. २० जून ते २० जुलै या कालावधीत बटाट्याची लागवड केली जाते. तालुक्‍यात सुमारे सहा ते सात हजार मेट्रिक टन बटाटा बियाण्याची लागवड होते. यंदा मात्र बटाट्याच्या बाजारपेठांत, तसेच बटाटा बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांत शुकशुकाट आहे. गेल्या वर्षी तालुक्‍यात बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्यांना बटाट्याचे उत्पादनही चांगले निघाले. मात्र, दर गडगडल्याने शेतकऱ्यांना बटाट्यातून नुकसानीलाच सामोरे जावे लागले. बटाट्याला दर कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या बटाट्याच्या शेतातून नांगर फिरविला. बहुतांश शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघाला नाही. 

भांडवलाची कमतरता
यावर्षी नोटाबंदीच्या निर्णयामुळे बॅंकिंग व्यवस्था काहीशी अडचणीत आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असली, तरी शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता येत नाही. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेतून थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीचे दहा हजार रुपयांचे कर्ज दिले जात असले, 

तरी बटाट्याच्या लागवडीसाठी हे दहा हजार रुपयांचे कर्ज पुरेसे नाही. त्यामुळे बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांना भांडवलाची कमतरता जाणवत आहे. सर्वसामान्य शेतकरी वर्ग या कचाट्यात चांगलाच अडकला आहे. 

यावर्षी चांगल्या दराची शक्‍यता
यावर्षी संपूर्ण देशभरात बटाट्याची लागवड कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे बटाट्याला दर चांगला मिळण्याची शक्‍यता आहे. विशेषत: वेफर्ससाठी लागणाऱ्या बटाट्याचे दर अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. काही प्रकारच्या वेफर्स, फ्लेवर्सला कच्चा बटाटा लागतो. त्याला शीतगृहात ठेवलेला बटाटा चालत नाही. त्यामुळे या बटाट्याला चांगला दर मिळण्याची शक्‍यता आहे.

करार पद्धतीची शेती फायद्याची
बटाटा बियाणे पुरविणाऱ्या व उत्पादित माल परत घेणाऱ्या काही खासगी कंपन्या करार पद्धतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या मालाबाबत हमीभाव देतात. ‘पेप्सिको इंडिया होर्डिंग्स’ ही कंपनी हमीभाव देते. सध्या ‘पेप्सिको’चा ११ रुपये ८० पैसे प्रतिकिलो असा हमीभाव आहे. या हमीभावाशिवाय शेतकऱ्यांनी कंपनीच्या करारानुसार ड्रीप, कीटकनाशकांचे किट घेतल्यास कंपनी संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून आणखी एक रुपये ६० पैसे प्रतिकिलो जादा दर देते. मूळ हमीभाव व प्रोत्साहनपर जादा दर असा १३ रुपये ४० पैसे प्रतिकिलोचा हमीभाव शेतकऱ्यांना मिळू शकतो. 

बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी करार शेतीला प्राधान्य द्यावे. उत्पादित बटाटा योग्य हमीभावाने खरेदी केले जात असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची शक्‍यता कमी असते. 
- शरद खाडे, बटाटा बियाणे विक्रेते