सोशल मीडियावर "प्रेमोत्सवा'ला बहर! 

सोशल मीडियावर "प्रेमोत्सवा'ला बहर! 

सातारा - प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणून जगभरात "व्हॅलेंटाइन डे' (14 फेब्रुवारी) साजरा होतो. त्याच्या तयारीने सध्या बाजारपेठेत, सोशल मीडियावर "प्रेमोत्सवा'ला बहर आला आहे. प्रेमाच्या या उत्सवासाठी शुभेच्छापत्रांबरोबरच विविध फ्लेवर्सच्या चॉकलेट्‌सची झालर लाभली आहे. चॉकलेटचे आकर्षक बॉक्‍स गिफ्ट देण्यावर अनेकांचा भर दिसतोय. व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर प्रेम संदेश, छायाचित्रांचा बहर आला आहे. 

गिफ्ट आर्टिकल्समध्ये प्रेमाचा संदेश असणारे कॉफी कप, फोटोफ्रेम; तसेच टेडीबेअरलाही मागणी आहे. म्युझिकल टेडीही तरुणाईला भुरळ घालत आहेत. विशेषतः लाल रंगाच्या गिफ्टसना यंदाही विशेष मागणी दिसतेय. "व्हॅलेंटाइन डे'साठी नक्षीदार व रंगबेरंगी बाटल्या, चॉकलेट, बुके, सुगंधी मेणबत्त्या, टेडीबेयर या व अशा विविध भेटवस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत. केवळ प्रियकर आणि प्रेयसीच नव्हे, तर आता नात्यातील प्रत्येकाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची क्रेझ वाढत आहे. त्यासाठी शुभेच्छापत्रांपासून ते विविध गिफ्ट आर्टिकल्सचा वापर होत आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी कॉलेज कॅम्पसमध्येही हवा झाली आहे. 

ब्रेसलेट्‌सला पसंती 
मनगटावर आपल्या आवडीनुसार धागा किंवा ब्रेसलेट्‌स बांधण्याची फॅशन कॉलेज तरुणाईमध्ये आहे. आजकाल हातात ब्रेसलेट्‌स घालणे ही एक नवीन स्टाइल झाली आहे. याला मोठमोठे सेलिब्रिटीजसुद्धा अपवाद नाहीत. लेदर, मेटल, चामडी, रेग्जीन, रबरी अशी विविध रंगीबेरंगी, नवनवीन प्रकारची ब्रेसलेट्‌स सध्या वापरात आहेत. "व्हॅलेंटाइन डे'च्या अनुषंगानेही खास ब्रेसलेट्‌स बाजारात दाखल झाली आहेत. 

गुलाबाची मागणी वाढणार 
प्रेमाचे प्रतीक असलेल्या लाल गुलाबाला उद्या सर्वाधिक मागणी असेल, याची गणिते जुळवून येथील फूल विक्रेत्यांनी गुलाबांच्या फुलांची आवक करून ठेवली आहे. फुलांची किंमत 15 ते 20 रुपयांवर पोचली आहे. बुकेंनी तरुणाईला भुरळ पडावी, यासाठी आकर्षक बुके तयार करून ते दर्शनी बाजूलाही मांडलेले दिसतात. प्रेम व्यक्‍त करण्यासाठी प्राधान्याने लाल गुलाब वापरले जाणार असल्याने त्याचीही मागणी वाढू शकेल. 

"व्हॅलेंटाइन डे'चीही आठवण ठेवा..! 
निवडणुकीची रणधुमाळी सध्या तेजीत असून, नेते, उमेदवार, कार्यकर्ते प्रचारात व्यस्त आहेत. निवडणुकीच्या या गडबड-गोंधळात आपल्या मित्र-मैत्रिणींचीही आठवण ठेवा अन्‌ त्यांच्याबरोबर "व्हॅलेंटाईन डे' साजरा करा; अन्यथा तुमचे मित्र-मैत्रीण "व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्यासाठी दुसऱ्या कुणाला तरी शोधतील, असा विनोदी संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com