चुरशीने 99.82 टक्के मतदान

चुरशीने 99.82 टक्के मतदान

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज दोन्ही जिल्ह्यांत अत्यंत चुरशीने मतदान झाले.

एकूण 570 मतदारांपैकी 569 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 99.82 टक्के मतदान झाले. कॉंग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांच्या लढतीत कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांच्या आव्हानामुळे रंगत निर्माण झाली. दोन्ही जिल्ह्यांत आठ केंद्रांवर मतदान झाले. मंगळवारी सांगलीत मतमोजणी होणार आहे.

विधान परिषदेसाठी होत असलेल्या या निवडणुकीत प्रथमच मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. आज सकाळी आठला मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यात एकूण चार मतदान केंद्रांवर 266 मतदान होते. सर्वाधिक 151 मतदान जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनमधील केंद्रावर होते. या ठिकाणी महापालिकेच्या एका नगसेवकाचे मतदान वगळता जिल्ह्यात एकूण 265 मतदान झाले.

सातारा जिल्ह्यातही चार मतदान केंद्रांवर एकूण 304 मतदान होते. यातील सातारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सर्वाधिक 140 मतदान होते. या सर्व ठिकाणी चुरशीने शंभर टक्के मतदान झाले.

गेले महिनाभर या निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे मतदानात कुठेही कमतरता राहू नये, याची दक्षता दोन्ही बाजूंनी घेतली गेली, तर बंडखोर उमेदवार शेखर माने यांनीही शेवटपर्यंत आपल्या भूमिकेशी ठाम राहत निवडणूक लढवली. त्यांनीही दोन्ही जिल्ह्यांतील मतदारांशी संपर्क केला होता. त्यामुळे मतदान चुरशीने झाले.

कॉंग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम, महापौर हारुण शिकलगार, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, डॉ. जितेश कदम, नगरसेवक राजेश नाईक, किशोर जामदार, तसेच कॉंग्रेस कार्यकर्ते सकाळपासूनच राजवाडा चौकात उपस्थित होते. सकाळी महापौर हारुण शिकलगार, नगरसेवक संतोष पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कॉंग्रेस सदस्य आले फेटे बांधून
महापालिकेतील कॉंग्रेसचे 23 सदस्य सकाळी दहा वाजता ट्रॅव्हल्समधून कोल्हापूरहून सांगलीत दाखल झाले. त्यानंतर सर्वजण फेटे बांधून युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांच्यासह चालत आले. उमेदवार मोहनराव कदम यांनी राजवाडा चौकात सर्वांचे स्वागत केले. हे सर्वजण मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी धनपाल खोत, सुलोचना खोत, राष्ट्रवादीचे अल्लाउद्दीन काजी, अनिता आलदर यांनीही फेटे बांधून त्यांच्यासोबत मतदान केले.

मोहनराव कदमांचा ठिय्या
उमेदवार मोहनराव कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पारावरच ठिय्या मारला. ते संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सकाळी आठ ते दुपारी साडेचारपर्यंत तेथे होते. कॉंग्रेसचे बहुतांशी जिल्हा परिषद सदस्य एकत्र आले.

स्वाभिमानी अखेर कॉंग्रेससोबत
स्वाभिमानी विकास आघाडीने अखेर कॉंग्रेससोबत आपण असल्याचे स्पष्ट केले. दुपारी तीनच्या सुमारास स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते गौतम पवार यांच्यासह त्यांचे दहा समर्थक नगरसेवक कॉंग्रसचे विश्‍वजित कदम यांच्यासह मतदानासाठी आले. त्यांनी आपल्या मागण्या कॉंग्रेस नेत्यांनी मान्य केल्याने आपण त्यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.

शेखर मानेंचा झटका
बंडखोर उमेदवार शेखर माने यांच्यासह त्यांचा गट अखेरपर्यंत एकत्र राहिला. त्यांच्या समर्थक दहा सदस्यांच्या गटासह उपमहापौर विजय घाडगेंसह ते दुपारी सव्वातीनला मतदानासाठी दाखल झाले. त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्नास अपयश आल्याचे मानले जाते. ते किती वाजता येतात, त्यांच्यासोबत किती मतदार असणार, याची उत्सुकता होती. त्यांचा समर्थक स्वाभिमानी आघाडी गट मात्र विश्‍वजित कदम यांच्यासोबत केंद्रावर आला.

राष्ट्रवादीचे गटागटाने मतदान
राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, लिंबाजी पाटील यांच्यासह पुरुष व महिला जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र मतदान केले. त्यानंतर त्यांचे सदस्य गटागटाने मतदानासाठी येत होते. राष्ट्रवादी कार्यालयातून त्यांना सूचना देऊन पाठवण्यात येत होते. पाच-पाच मतदारांचे राष्ट्रवादीचे गट केंद्रावर शांतपणे दाखल होत होते.

प्रकृती बिघडल्याने सदस्य गैरहजर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य सुनील कलगुटगी हे मतदानासाठी गैरहजर राहिले. ते कॉंग्रेससाठी म्हणून गोवा सहलीला गेले होते. तेथे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सांगली केंद्रावर 151 पैकी 150 मतदान झाले.

जतच्या नगरसेवकांना प्रथमच संधी
जतमध्ये सकाळी नऊ वाजताच विक्रम सावंत गटाच्या दहा नगरसेवकांनी मतदान केले. त्यानंतर दुपारी तीन वाजता सुरेश शिंदे गटाच्या आठ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील मनोहर पट्टणशेट्टी यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना सायकलवरून आणण्यात आले, तर नगराध्यक्ष इकबाल गवंडी आणि माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी शेवटच्या टप्प्यात मतदान केले.

जयंत पाटील इस्लामपुरात
इस्लामपूर तहसील कार्यालयात आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिका सदस्यांचे मतदान होते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी इस्लामपुरात तळ ठोकला. त्यांच्यासह आष्ट्याचे विलासराव शिंदेही होते. त्यांनी जातीने मतदानावर लक्ष ठेवले. विट्यात प्रांत कार्यालयात तासगाव आणि विटा नगरपालिका सदस्यांचे मतदान होते.

पतंगराव कदम साताऱ्यात
कॉंग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम हे दिवसभर सातारा येथे होते. त्यांनी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह तेथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. शेखर माने यांनीही आपला मतदारसंघ दौरा म्हसवडपासून सुरू केला.

मतदान केंद्रनिहाय झालेले पुरुष व स्त्री मतदान
मतदान केंद्र पुरुष स्त्री मतदान

1- वाई 34 32 66
2- फलटण 24 23 47
3- सातारा 67 73 140
4- कऱ्हाड 25 26 51
5- विटा 24 22 46
6- इस्लामपूर 26 23 49
7- सांगली 74 76 150
8- जत 11 9 20
एकूण 285 284 569

मतमोजणी मंगळवारी
या मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (ता. 22) माधवनगर रोडवरील महसूल सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात होईल.

नेते खेळीमेळीत
युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम सकाळी नऊपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपस्थित होते. त्यांनी जातीने मतदानावर लक्ष ठेवले. सकाळी साडेनऊ वाजता सांगली म्युझियमजवळ राष्ट्रवादीचे संजय बजाज, देवराज पाटील उपस्थित असताना, कदम यांनी त्यांच्याशी काही वेळ गप्पांचा फडही रंगवला. त्यावेळी महापौर हारुण शिकलगारही होते, तर दुपारी शेखर माने आपल्या समर्थकांसह येत असताना न्यायालय इमारतीसमोर दोघांची भेट झाली. यावेळी कदम यांनी त्यांना, "काय उमेदवार, असे बोलवून नमस्कार केला. त्यांच्या या खेळीमेळीच्या वर्तणुकीची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. श्री. कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासह आठ तास केंद्रस्थळी तळ ठोकला होता.

नेते म्हणाले
आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते
मोठा घोडेबाजार झाला तरी राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित आहे. शेखर गोरे साठ ते सत्तर मतांनी विजयी होतील. आमची भिस्त निष्ठावान कार्यकर्त्यांवर असल्याने आम्हाला धोका वाटत नाही.

मोहनराव कदम, कॉंग्रेसचे उमेदवार
प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला वाटायचे, की मोहनरावला गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत काही मिळाले नाही. ही उणीव पक्षाने मला उमेदवारी देऊन भरून काढली. ते सारे सर्वपक्षीय कार्यकर्तेच मला विजयी करतील.

विश्‍वजित कदम, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
कॉंग्रेस पक्षाची एकसंध ताकद या निवडणुकीत दिसून आली. माजी आमदार संभाजी पवार यांनी सहकार्याचा शब्द दिला. सर्वोदयच्या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. यापुढे महापालिकेतील सत्तेत आम्ही स्वाभिमानी आघाडीला विचारात घेऊ.

शेखर माने, कॉंग्रेस बंडखोर उमेदवार
गुंडगिरीने आणि पैशाच्या जीवावर सारे काही करता येते, हा भ्रम पुसून टाकणे आणि सर्वच पक्षांतील सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी माझा लढा होता. माझ्या माघारीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांना निकालानंतर सामान्य कार्यकर्त्याची ताकद कळून येईल.

गौतम पवार, स्वाभिमानी आघाडीचे नेते
जयंत पाटील यांच्या हिणकस राजकारणाविरोधातील आमचा लढा कायम राहील. मोहनराव कदम, माजी मंत्री पतंगराव कदम यांनी आम्हाला "सर्वोदय'च्या लढ्यात पाठिंबा द्यायचा शब्द दिला आहे. ते "सर्वोदय'बाबत मंत्री असताना त्यांना अंधारात ठेवून डाव साधला गेला. आता ती चूक दुरुस्त करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com