सातारा जिल्ह्यात 100 टक्के मतदान

सातारा जिल्ह्यात 100 टक्के मतदान

सातारा - विधान परिषदेच्या सांगली- सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेखर गोरे, कॉंग्रेसचे मोहनराव कदम यांच्यात सुरू असलेली आमदारकीची लढत आज मतदानाने सीलबंद झाली. 570 पैकी 569 उमेदवारांनी मतदान केले. सातारा जिल्ह्यात 100 टक्के मतदान झाले. दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला जात असला, तरी मतदारांचा कौल कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. 22) मतमोजणीनंतर लागेल.

जिल्ह्यातील चार मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाले. सातारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सातारा पालिकेचे नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी प्रथम मतदान केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी मतदान केले. या मतदान केंद्रावर राष्ट्रवादीकडून आमदार शशिकांत शिंदे, तर कॉंग्रेसकडून सुनील काटकर हे मतदान प्रतिनिधी होते. सकाळी 11 वाजता माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील हे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह येऊन मतदानाची माहिती घेतली. खासदार उदयनराजे भोसले हे मतदारांसह केंद्रावर आले. त्यानंतर थोड्याच वेळेत आमदार जयकुमार गोरे हे कॉंग्रेसचे काही मतदार घेऊन आले. एकाच वेळी मतदार आल्याने केंद्रावर गर्दी झाली. सातारा केंद्रावर दुपारी दीड वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले. मध्यंतरीच्या काळात कोरेगाव, माण येथील कॉंग्रेसचे मतदार मतदानासाठी येऊन गेले. याच दरम्यान पुन्हा जयकुमार गोरे केंद्रावर आले. सुनील काटकर यांच्याकडून त्यांनी मतदानाचा अंदाज घेतला. मंगळवारी इतिहास घडेल, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.
चार वाजता मतदान संपणार होते. साडेतीन वाजले तरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आपल्या मतदारांना घेऊन आले नसल्याने शशिकांत शिंदे अस्वस्थ झाले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोनाफोनी करत होते.

तेवढ्यात शिवेंद्रसिंहराजे 23 मतदारांसह आले. त्यावेळी 140 पैकी 138 मतदान झाले होते. दोन मते राहिली होती. त्यानंतर विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या सुरेखा पाटील व सर्वात शेवटी जिल्हा परिषदेच्या अपक्ष सदस्या मंगला घोरपडे यांनी मतदान केले.

आमदारच कारभारी
मते फुटण्याची भीती असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर आमदार आपले मतदार स्वत: घेऊन येत होते. साताऱ्यात उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे यांनी आपआपले मतदार घेऊनच केंद्रावर "एन्ट्री' मारली. मतदान झाल्यावरही ते मतदारांसोबत गेले.

'तर उमेदवारच दिला नसता'
डॉ. पतंगराव कदम हे सातारा केंद्रावर येताच शशिकांत शिंदे, सुनील माने यांनी त्यांचे स्वागत केले. गप्पा सुरू असताना अजित चिखलीकर यांनी सुनील मानेंनी उमेदवारी घ्यायला पाहिजे होती, अशी कोपरखळी मारली. त्यावर "ते उमेदवार असते तर आम्ही उमेदवारच दिला नसता,' या पतंगरावांच्या टिपणीने हशा पिकला.

वोट... नोट...!
निवडणुकीत नोट आणि वोटचीच चर्चा रंगली. मतदान केंद्राजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावरून उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ""लोकांचा उद्रेक झाला पाहिजे. लोकांना खर्चाला पैसे नाहीत,'' असे ते म्हणाले. ""सहकारी बॅंका बंद पाडण्याचा डाव असून, पुढे रिझर्व्ह बॅंकेच्या ताब्यात बॅंका देण्याचा हा प्रयत्न आहे. नोटाबंदीचा आम्हाला काही फटका बसला नाही,'' असे शशिकांत शिंदे बोलले. ""पैसे बदलण्याची अडचण झाली आहे,'' अशी टिपणी गोरेंनी केली. त्यावर कडी करत ""तुमच्याकडे असतील तर द्या, आम्ही बदलून देतो,'' अशी कोपरखळी शिंदेंनी मारली. या विषयावर उदयनराजे पुन्हा बोलू लागल्याने उदयनराजेंकडे पाहून "येतो आम्ही,' असे म्हणत गोरे निघून गेले.

'बिग बॉस' अन्‌ हसू...!
मतदान केंद्राच्या दारातच उदयनराजे, शशिकांत शिंदे व जयकुमार गोरे यांच्यात गप्पा रंगल्या. उदयनराजे म्हणाले, ""जिल्ह्यात एकच फलटणचे म्युझियम आहे. त्यातील रामराजेंना मी दररोज उठल्यावर नमस्कार करतो.'' यावर एकच हशा पिकला. जिल्ह्यातील राजकारण्यांचा "बिग बॉस' असावा, असा विषय काढत शशिकांत शिंदे म्हणाले, ""जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा मिळून एका "बिग बॉस'ची नेमणूक करूया. सर्वांनी एकत्र बसून ठरवू. कोणाचे नाव निघेल?'' त्याच वेळी उपस्थितांतून उदयनराजेंचे नाव पुढे आले. त्यावर उदयनराजे मात्र गालात हसले.

झालेले मतदान..
मतदान केंद्राचे नाव आणि मतदान : सातारा जिल्हा ः वाई- 66, फलटण- 47, सातारा- 140, कऱ्हाड- 51. सांगली जिल्हा : विटा- 46, इस्लामपूर- 49, सांगली- 150, जत- 20.

सातारा - सांगली- सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील केंद्रावर शनिवारी झालेल्या मतदानाच्या वेळी खासदार उदनराजे भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे व जयकुमार गोरे हास्यविनोद करत निवडणुकीचा ताण घालवताना दिसत होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com