कोणी डॉक्‍टर देता का डॉक्‍टर!

कोणी डॉक्‍टर देता का डॉक्‍टर!

वाईतील ग्रामीण रुग्णालयाला मिळेना वैद्यकीय अधिकारी; तीनही पदे रिक्त

वाई - गेल्या तीन-चार वर्षांपासून वाईच्या ग्रामीण रुग्णालयात एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे  ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असून खासगी रुग्णालयातून त्यांची ‘लूट‘ होत आहे. एक जूनला या ठिकाणी दोन डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली, तसे आदेशही निघाले. मात्र, अद्याप कोणीही हजर न झाल्याने ‘कोणी डॉक्‍टर देता का डॉक्‍टर’, असे म्हणण्याचा प्रसंग रुग्णालय प्रशासनावर आला आहे.    

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या रुग्णालयात अत्यावश्‍यक सर्व सोयी-सुविधा असल्याने वाई, महाबळेश्वर व जावळी तालुक्‍यांतील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी येथे येतात. रुग्णालयात आंतररुग्ण विभागात ३० खाटांची सोय असून शस्त्रक्रिया, क्ष- किरण, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, रक्त साठवणूक केंद्र (मिनी ब्लड बॅंक), औषध विभाग अशा सोयी उपलब्ध आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आयपीएचएस रुग्णालय म्हणून घोषित आहे. या ठिकाणी बाह्यरुग्ण विभागात दररोज २५० ते ३०० रुग्णांची तपासणी केली जाते. पूर्वी सिझेरियन व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होत होत्या. त्यामुळे आंतररुग्ण विभाग कायम ७५ टक्के भरलेला असायचा.

आज मात्र कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे रुग्णालय ‘सलाइन’वर आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीनही पदे रिक्त आहेत. एक महिन्यापूर्वी ११ महिन्यांसाठी रुजू झालेले अस्थायी डॉ. सागर तोरस्कर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन पाटील यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. पावसाळ्यात वातावरण व दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्‍यता असते. अशा स्थितीत ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य लोकांना किरकोळ आजार, सर्पदंश, अपघात झाल्यास प्राथमिक उपचारासाठी तसेच महिलांना कमी खर्चात बाळंतपणासाठी हे रुग्णालय आधारभूत ठरते. येथे स्त्री-आरोग्य तज्ज्ञ नसल्याने बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना सिझर करण्यासाठी खासगी हॉस्पिटलचा मार्ग धरावा लागतो. 

या रुग्णालयात डॉक्‍टरच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण, दुर्गम भागातील गरीब ब गरजू लोकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामीण रुग्णालयासाठी डॉक्‍टर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याबाबत विविध स्तरावरून पाठपुरावा केल्यानंतर एक जून रोजी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री-आरोग्य तज्ज्ञ डॉ. धुमाळ तसेच उंडाळे ग्रामीण रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. कोणगुळकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, दोन्ही डॉक्‍टरांनी अद्याप कार्यभार स्वीकारला नसल्याने आरोग्य सेवेची ‘जैसे थे’ स्थिती आहे.

उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा गरजेचा
उपजिल्हा रुग्णालय होईल एवढी रुग्णांची क्षमता या ठिकाणी आहे. तसे झाल्यास डॉक्‍टरांची संख्या वाढेल. त्यासाठी दोन वेळा प्रस्तावही मागविण्यात आले होते. त्यासाठी निधीदेखील उपलब्ध झाला होता. परंतु, केवळ शासनाच्या नियमानुसार जागा उपलब्ध होत नसल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्ताव मंजुरीत अडचणी येत आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

शासनाने रुग्णालयाला तातडीने डॉक्‍टर उपलब्ध करून द्यावेत, अशा मागणीचा ठराव रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करून त्यांच्या प्रती शासनाच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

- डॉ. मोहन पाटील,  वैद्यकीय अधीक्षक, वाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com