टंचाई बैठकीची पालकमंत्र्यांना उपरती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सोलापूर - उजनीची पाणीपातळी वजा 23 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. विजेच्या भारनियमनाने त्यात भर पडली आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांनी उन्हाळा सहन करत दिवस घालवले. उन्हाळ्याचे काही दिवस राहिले आहेत, मॉन्सून तोंडावर आला आहे, अशातच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना आता पाणीटंचाईच्या बैठका घेण्याची उपरती झाली आहे. 

आज माळशिरस व मंगळवेढा या दोन तालुक्‍यांत बैठका झाल्या. गेल्या दोन- तीन वर्षांच्या दुष्काळामुळे लोक खूप शिकले आहेत. गेल्या वर्षी उशिरा पण पुरेसा पाऊस झाल्याने आजही काही गावांत पाणी टिकून आहे, त्यामुळे लोकांनी स्वतःच पाण्याचे नियोजन केले; पण काही गावांत आजही पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. वास्तविक, जानेवारी- फेब्रुवारीमध्येच या बैठका घेणे अपेक्षित होते; पण ना प्रशासनाने हालचाली केल्या, ना लोकप्रतिनिधींनी. यंदा आतापर्यंत एकही टॅंकर सुरू झालेला नाही (की केला नाही), लोकांची मागणी नाही, यावरूनच प्रशासनाने टंचाई किती आहे हे ठरवून टाकले. आता मेच्या मध्यामध्ये आल्यानंतर विहिरी आणि बोअर तळाला गेल्याने लोकांची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना आणि प्रशासनाला बैठकांचा फार्स सुचला आहे. आता बैठका होतीलही; पण टॅंकरची मागणी, त्याचे प्रस्ताव, मंजुरी या सगळ्या प्रक्रियेत त्याचा कितपत फायदा टंचाईग्रस्तांपर्यंत पोचेल, हे सांगता येत नाही. यावरून टंचाईसाठी प्रशासन वा लोकप्रतिनिधी किती गंभीर आहेत हे लक्षात येते. आता पालकमंत्री किती तालुक्‍यांत जातात आणि हा फार्स करतात, त्याकडे पाहावे लागेल. 

उजनी धरणातून मागणी नसतानाही कालव्यातून पाणी सोडले. स्वतः शेतकऱ्यांनी पाणी नको, नको म्हणून सांगितले होते. दुसरीकडे धरण वजा 23 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जागावे लागत आहे. या प्रश्‍नावर काहीच न बोलणारे पालकमंत्री एवढ्या उशिरा टंचाई बैठकीसाठी पुढाकार घेऊन काय साधणार, हा खरा प्रश्‍न आहे.