खानापूर तालुक्‍यातील पाणीसाठे आटले 

दिलीप कोळी
गुरुवार, 6 एप्रिल 2017

विटा - खानापूर तालुक्‍यातील दुष्काळी पट्ट्यात पाणीसाठे संपुष्टात येऊ लागले आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तालुक्‍यातील लोकांच्या मागणीनुसार 12 गावे व 30 वाड्या-वस्त्यांवर प्रशासनाने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. टॅंकरसाठी आणखी टंचाईग्रस्त गावातून पाण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या 26 हजार 30 लोकांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. 

विटा - खानापूर तालुक्‍यातील दुष्काळी पट्ट्यात पाणीसाठे संपुष्टात येऊ लागले आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तालुक्‍यातील लोकांच्या मागणीनुसार 12 गावे व 30 वाड्या-वस्त्यांवर प्रशासनाने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. टॅंकरसाठी आणखी टंचाईग्रस्त गावातून पाण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या 26 हजार 30 लोकांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. 

उन्हाळ्यापूर्वी तीन महिने अगोदरपासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नोव्हेंबर 2016 पासून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. गेली सहा ते सात वर्षे सतत तालुक्‍यातील लोकांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. दुष्काळी स्थितीत पाण्याचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे, ओढ्यावरील सिमेंट बंधारे, माती बंधारे, समतल चर अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. परंतु पाऊस कमी जास्त प्रमाणात पडत असल्याने पाणीसाठे अल्प प्रमाणात होत आहेत. त्यामुळे पाणीसाठे होण्यासाठी केलेली ही जलसंधारणाची कामे निष्फळ ठरत आहेत. मोठ्या प्रमाणात पाणीसाठे होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या तालुक्‍यातील गावांच्या जत्रा, यात्रा सुरू आहेत. यात्रेदरम्यान पाणीटंचाई होऊ नये, यासाठी दानशूर व्यक्ती टॅंकरने पाणीपुरवठा करत आहेत. त्यामुळे यात्रेपुरती पाण्याची तहान भागत आहे. त्यानंतर काय ? असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. 

तालुक्‍यातील विहिरी, कूपनलिका, तलावातील पाणीसाठे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे उन्हाळी शेती कोलमडून पडली आहे. तालुक्‍यात जनावरांची संख्या जास्त आहे. खरीप हंगामात हायब्रीडची वैरण व रब्बी हंगामातील शाळू पिकाची वैरणी शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात झाल्या आहेत. त्यामुळे जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटला आहे. परंतु पाणीटंचाईने मात्र हैराण केले आहे. वरील बारा गावे व तीस वाड्यांबरोबर तालुक्‍यातील आणखीन टंचाईग्रस्त सांगोले, देवनगर, घोटी बुद्रुक, भूड येथील ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी केली आहे. त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. आटपाडी व खानापूर तालुक्‍यात ज्याठिकाणी विहिरी व बोअरमध्ये पाणीसाठे उपलब्ध आहेत. तेथील विहिरी व बोअर अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावात पाणीपुरवठा केला जात असल्याचे गटविकास अधिकारी संतोष जोशी यांनी सांगितले. 

टॅंकरने पाणी- एक दृष्टिक्षेप 
गावे - 12 
वाड्या - 30 
मंजूर खेपा - 45.50 
प्रत्यक्ष खेपा - 45.80 
टॅंकर - शासकीय 3, खासगी 9 
लोकसंख्या - 26,038 

Web Title: water reserves dried up