पाणीयोजना पूर्ण करण्यात अखेर अपयश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

कोट्यवधींची रस्त्यांची कामे सुरू; अपेक्षित गती नसल्याने नाराजी भोवणार?

कोट्यवधींची रस्त्यांची कामे सुरू; अपेक्षित गती नसल्याने नाराजी भोवणार?
कऱ्हाड - कृष्णा-कोयना नदीकाठी असलेल्या शहराला मुबलक पाणी असले तरी 24 तास पाणी देण्यासाठी 2010 मध्ये सुरू झालेल्या योजनेचे काम या पाच वर्षांत अंतिम टप्प्याकडे नेण्यात सत्तारूढ आघाडीला यश आले. मात्र, योजना पूर्ण करता आली नाही. शहरातील रस्त्याबाबतीतही साडेचार वर्षांत रस्त्याची दुरवस्था चर्चेत राहिल्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीचा सूर आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात शहरातील सर्वच रस्त्यांच्या कारपेट कामास सुरवात केल्यामुळे रस्त्याबाबतची नाराजी कितपत दूर होणार, हे निवडणुकीनंतरच्या निकालातूनच स्पष्ट होईल.

शहरासह विस्तारित भागासाठी पालिकेने 24 तास पाणी योजना हाती घेतली. 2010 मध्ये या योजनेचा प्रारंभ झाला. वास्तविक कोयना व कृष्णा नदीकाठी असलेल्या या शहराला पाणी मुबलक असल्याने पालिका दररोज सकाळ व संध्याकाळी पाणीपुरवठा करते. तरीही पाणी बचतीसाठी व तोट्यात असणारी पाणी योजना सुस्थितीत आणण्यासाठी 24 तास योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात नेण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी योजना कार्यान्वित होईल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. मात्र, तसे झालेले नाही. मात्र, हद्दवाढ भागात ज्या ठिकाणी पाणीपुरवठा होत नव्हता, त्या ठिकाणी 24 तास योजनेतील टाक्‍या कार्यान्वित करून हद्दवाढ भागाला पाणी देण्याचे काम करण्यात आले आहे. शुक्रवार पेठेतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची जुनी तक्रार अद्यापही कायम आहे. मात्र, पाण्याबाबत कऱ्हाडवासीयांना अन्य ठिकाणाप्रमाणे कधीही पालिकेवर आंदोलन करण्याची वेळ आजतागायत आली नाही, हे या पालिकेचे वैशिष्ट्य कायम आहे. 24 तास योजनेच्या टाक्‍या कार्यान्वित करून तेथून दोन वेळा पाणी देण्याची व्यवस्था करण्याबरोबरच रुक्‍मिणीनगरसह लगतच्या भागात पाणी कनेक्‍शनला मीटर बसवण्याची कार्यवाहीही सुरू झाली आहे.

पाणी व ड्रेनेज योजनेच्या कामामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहरातील रस्त्याला पॅचिंगच्या कामाशिवाय डांबर मिळाले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका सामान्यांना सोसावा लागला. ड्रेनेज व पाणी योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आल्याने रस्त्यांचे खोदाकाम होणार नसल्याचे निश्‍चित झाल्याने पालिकेने रस्त्याच्या कारपेट कामांना सुरवात केली.

फेब्रुवारीमध्ये या रस्त्यांच्या कामांना मंजुरी घेण्यात आली. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गेल्या आठवड्यातच सुमारे 50 हून अधिक रस्त्यांच्या कामाचा कार्यादेश देण्यात आला. सुमारे दहा कोटींची ही कामे आहेत. आचारसंहितेपूर्वी कार्यादेश दिल्याने यातील अनेक कामे सुरूही झाली आहेत. कोल्हापूर नाका ते कार्वे नाका तसेच पोपटभाई पेट्रोल पंप, भेदा हॉस्पिटलमार्गे शाहू चौकापर्यंच्या 11 कोटींच्या रस्त्याच्या कामासही सुरवात झाली. मात्र, कामाला अपेक्षित गती नसल्याचे दिसून येते. तांत्रिक अडचणीचे कारण देत शेवटच्या टप्प्यात सुरू केलेल्या रस्त्याच्या कामांचे कारण शहरवासीयांना कितपत भावणार, हे निवडणूक निकालावरूनच स्पष्ट होईल.

सोशल मीडियावर विनोदही...
शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कऱ्हाडवासीय उदासिन असल्याने गेल्या काही दिवसांपासून रस्त्यासंदर्भात फेसबुक, व्हॉट्‌सऍप आदी सोशल मीडियावर अनेक विनोद फिरत आहेत. त्यावरून रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल सामान्यांची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते.

टॅग्स