पाणी आलं अन्‌ घरदार धावलं!

संजय जगताप
बुधवार, 22 मार्च 2017

मायणी - तीव्र पाणीटंचाईने हैराण होऊन, रात्रं-दिवस पाण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या नागरिकांनी नळाला पाणी येताच आनंद व्यक्त केला. सारं घरदार नळावर पाणी भरण्यासाठी तुटून पडलं. ऐन यात्रा काळात पाणीपुरवठा सुरू झाल्याने लोकांना दिलासा मिळाला. समन्वय समिती व प्रशासनातील चर्चेत तोडगा निघाला नसल्याने प्रादेशिक योजनेचे भिजत घोंगडे पडले आहे.     

ऐन यात्रेच्या तोंडावर थकीत वीज बिलापोटी मायणी प्रादेशिक योजनेची वीज तोडली. त्यामुळे मायणीसह चितळी, गुडेवाडी, मोराळे व मरडवाक या चार गावांचा पाणीप्रश्न निर्माण झाला. तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लोक पाणी विकत घेत आहेत. वस्त्या व उपनगरांतील रहिवाशांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रादेशिक योजना पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी समन्वय समितीने महावितरण व प्रशासनाकडे विविध पर्याय ठेवले. पण, पर्याय निघाला नाही. तात्पुरता उपाय म्हणून पंचायतीने बदाच्या ओढ्यातील महादेव शेवाळे यांच्या खासगी विहिरीतून पाणीपुरवठा करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार तीन किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. त्याद्वारे गावालगतच्या अनफळे ओढ्यातील सार्वजनिक विहिरीत पाणी आणण्यात आले. चार मार्चपासून बंद झालेला पाणीपुरवठा काल (ता. २०) काही भागात सुरू झाला. नळाला पाणी येताच लोकांनी भांडी भरून घेतली. मात्र, गावाच्या सर्व भागात पाणीपुरवठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे उपनगरे व वाड्या-वस्त्यांवरील टंचाईची तीव्रता कमी झालेली नाही. तालुका प्रशासनाने एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यास सुरवात केली आहे. मात्र, बाधित लोकसंख्या व यात्राकाळ पाहता आणखी तीन टॅंकरची आवश्‍यकता आहे, असे प्रादेशिक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष दादासाहेब कचरे यांनी नमूद केले.

यात्रा कालावधी, तसेच टंचाईच्या काळात लोकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- प्रकाश कणसे, प्रभारी सरपंच, मायणी