नदीकाठच्या गावात जलयुक्त शिवार

नदीकाठच्या गावात जलयुक्त शिवार

गडहिंग्लज : जलयुक्त शिवार योजनेत गावांची निवड कोणी केली? गतवर्षी टंचाई आराखड्यात 12 गावे होती, ती का निवडली नाहीत? नदीकाठच्या गावात जलयुक्त शिवार करताय का? अशा एक ना अनेक प्रश्‍नांचा हल्लाबोल सत्ताधारी भाजपचे सदस्य विठ्ठल पाटील यांनी आज झालेल्या पंचायत समिती सभेत चढविला.

गडहिंग्लज पंचायत समितीला कोण विचारत नाही, जिल्ह्यात झिरो किंमत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यापुढे शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीनेच खासगी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्याचा ठराव सभेत करण्यात आला. सभापती जयश्री तेली अध्यक्षस्थानी होत्या. 

तालुका कृषी विभागाच्या सनसनाटी आढाव्यानेच सभेला सुरवात झाली. जलयुक्त शिवार योजनेत तालुक्‍यातील 29 गावांचा समावेश झाला असल्याची माहिती मंडल कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी दिली. या गावांची निवड कोणत्या आधारावर केली, असा सवाल विठ्ठल पाटील यांनी केला. कडगाव भागातील गावामध्ये पाणी टंचाई असताना एकही गाव या यादीत नसल्याचा जाब त्यांनी विचारला. गतवर्षीच्या आराखड्यातील गावे घेतली असल्याचे सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्ष यादीत नावे नसल्याचे सांगत सभापती सौ. तेली यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण, यापूर्वी केलेला सर्व्हे चुकीचा होता का? पाणी टंचाईच्या गावात अधिकारी येऊन गावकऱ्यांना खेळ दाखवितात का? अशा शब्दात श्री. पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पाणी टंचाई असणाऱ्या गावांचा जलयुक्तमध्ये समावेश करावा, याबाबतचा ठराव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रज्ञाशोध परीक्षेचा विषय मागील तीन सभेमध्ये गाजला होता. त्यामुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर. आर. कोरवी यांनी तालुक्‍यात झालेल्या प्रज्ञाशोध परीक्षेची माहिती सभागृहाला दिली. पालकांची इच्छा असल्यानेच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पण, विद्यार्थ्यांकडून घेतले जाणारे शुल्क आणि पुरविल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत सदस्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. परीक्षेचा धंदा केला असल्याचा आरोप विद्याधर गुरबे यांनी केला. गुणवत्तेबाबत अटी घालून शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय खासगी प्रज्ञाशोध परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, असा ठराव करण्यात आला. परीक्षांच्या काळात घेतल्या जाणाऱ्या स्नेहसंमेलनावरून श्री. पाटील यांनी तर शिक्षक प्रशिक्षणावरून श्रीया कोणकेरी यांनी धारेवर धरले. उपसभापती बनश्री चौगुले यांनी शाळा दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. 

डोणेवाडीला अद्याप बससेवा सुरू झालेली नाही. सर्व्हे करून जूनपर्यंत बससेवा सुरू करावी, अशी मागणी श्री. गुरबे यांनी केली. विविध गावांच्या यात्रांच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. विविध कारणांनी 15 कामे रद्द झाली असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. एस. जाधव यांनी दिली. यासह विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. सहायक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. सदस्य इराप्पा हसुरी, इंदू नाईक, रूपाली कांबळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com