अचानक आलेल्या थंडीने आणला सर्दी, खोकला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कोल्हापूर - यंदाच्या फेब्रुवारीत 37 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हेच तापमान 2016 मध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस होते. यामुळे यंदा लवकर उन्हाळा सुरू झाल्याचे वातावरण निर्माण झाले; मात्र मार्चमधील चार ते आठ तारखेदरम्यान वाढलेला हा तापमानाचा पारा अचानक खाली उतरला. सकाळी, संध्याकाळी, मध्यरात्री तर चक्क थंडी पडली. दिवसभर वाऱ्याचा वेगही जोरदार होता. 

कोल्हापूर - यंदाच्या फेब्रुवारीत 37 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हेच तापमान 2016 मध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस होते. यामुळे यंदा लवकर उन्हाळा सुरू झाल्याचे वातावरण निर्माण झाले; मात्र मार्चमधील चार ते आठ तारखेदरम्यान वाढलेला हा तापमानाचा पारा अचानक खाली उतरला. सकाळी, संध्याकाळी, मध्यरात्री तर चक्क थंडी पडली. दिवसभर वाऱ्याचा वेगही जोरदार होता. 

एक मार्चला 38 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असताना अशी एकदम थंडी पडण्याचे कारण, उत्तर भारतातील पाऊस आणि हिमालयाच्या पायथ्याशी झालेली बर्फवृष्टी; मात्र सकाळी, संध्याकाळी जाणवणारी ही थंडी 16 तारखेपासून कमी होऊन तीव्र उन्हाला सुरवात होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

मार्च 2016 मधील तापमान पाहिले, तर ते 31 ते 36 डिग्री सेल्सिअस होते; मात्र यावर्षी आजपासून (ता. 13) मार्चमधील तापमान हे 36 ते 39 डिग्री सेल्सिअस राहील. 26 तारखेला तापमान 41 डिग्री सेल्सिअस होईल, अशी नोंद ऍक्‍युवेदरवर आहे. म्हणजेच, यंदाचा उन्हाळा तीव्र होणार हे नक्की. ही नैसर्गिक परिस्थिती तयार झाली असली तरी त्याचा थेट परिणाम आरोग्यावर जाणवला. या कालावधीत सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखी, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. यंदा जानेवारीच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत वाढलेल्या तापमानाचा परिणाम जिल्ह्यातील अनेक छोट्या-मोठ्या पाणीस्रोतांवरही झाला आहे. अनेक ठिकाणचे छोटे स्रोत सुकले आहेत. यामुळे पिकाला पाणी, पिण्यासाठी उपलब्धता करून देण्यातही आतापासूनच अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे. 

तज्ज्ञांना सल्ला 

""अचानक उन्हाळा सुरू झाला, याबरोबर चार दिवसांपासून थंडीही जाणवली याचे कारण म्हणजे, उत्तर भारतात गेल्या आठवड्यात गारपिटीसह पाऊस झाला. उत्तर भारतातून सतत येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मार्चमध्ये सुरवातीपासून आजपर्यंत सकाळी, संध्याकाळी थंडी अन्‌ दिवसा वातावरण उष्ण राहिले. अजूनही तीव्र उन्हाळा सुरू झालेला नाही. साधारणपणे 16 मार्चच्या पुढे तापमान वाढत जाईल. '' 
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ 

""हवामानात बदल सुरू झाले, की निर्माण झालेल्या पोषक वातावरणात जीवाणू, विषाणूंची संख्या वाढू लागते. अशावेळी लगेच संसर्ग होतो. या काळात उघड्यावरील अन्नपदार्थ, कलिंगडे, टरबूज, अननससारखी कापून ठेवलेली फळे अजिबात खाऊ नका. उघड्यावरील फळांचे रसही पिऊ नका; कारण उष्ण वातावरणात घरमाशांची संख्या झपाट्याने वाढू लागते. या घरमाशा कुजलेल्या पदार्थांवर, शौचावर बसतात, तशाच त्या अन्नपदार्थांवरही बसतात. यामुळे अन्न दूषित होते. तेच अन्न आपण खाल्ले, की पोटाचे विकार होतात. उष्णता वाढली, की शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही क्षीण होते. यामुळे संतुलीत आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचे प्रमाण वाढवा.'' 
- डॉ. प्रवीण हेंद्रे, अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन 

""वातारवरणातील बदलामुळे घसा दुखणे, खोकला, श्‍वसननलिकेला सूज, सर्दी, पडशांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. हे सर्व जीवाणू, विषाणूंच्या वाढीमुळे होते. या रोगांचा चार ते पाच दिवस प्रभाव राहतो. याबरोबर विविध ऍलर्जी, स्वाईन फ्लूचाही धोका निर्माण होतो. लहान मुलांना या कालावधीत जपावे लागते. मागील दोन ते चार वर्षात अशा रुग्णांची संख्या वाढली होती. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या घटकांचा आहारात समावेश करावा.'' 
- डॉ. आर. एस. पाटील, अंबिका पॅथॉलॉजी 

"" ढगाळ वातावरण, थंडी, उष्णता या बदलत्या वातावरणामुळे पिके विविध रोग, किडींना बळी पडतात. अशावेळी शेतकऱ्यांनी पिकांवर तातडीने औषधी फवारणी करावी. कोल्हापूर जिल्ह्याचा सध्याचा पीक पॅटर्न हा काहीसा स्थिर आहे. हा जिल्हा रब्बीचा नाही. गहू, हरबरा, वाटाण्यासारखी तुरळक पिके घेतली जातात. तरीही हवामानाचा वेध घेऊन पिकपद्धतीत बदल करणे. पिकांच्या विविध प्रजाती विकसित करणे आदी गोष्टी कराव्या लागतील; जेणेकरून उत्पादन सतत वाढते राहील.'' 
- ए. के. मुल्ला, निवृत्त शेती अधिकारी 
 

पिकांवरील परिणाम 
तापमानातील बदल सुरू झाले, की पर्जन्यचक्र आणि कार्बनडायऑक्‍साईच्या पातळीवर परिणाम होतो. विविध प्रजातींची कीड, तणे वाढतात. कमी पाणी, भू-औष्णिक ऊर्जेच्या पातळीतील बदलांमुळेही पीक उत्पादन घटते. विशेषत: गहू, मका, द्विदल धान्येवर्गीय पिके या बदलांपुढे टिकत नाहीत. 

मार्च 2017 तापमान (डिग्री सेल्सिअस) 
ऍक्‍युवेदरवरील नोंदीनुसार, 1 मार्च (38), 2 (33), 3 (34), 4 (32), 5 (32), 6 (33), 7 (32), 8 (33), 9 (35), 10 ते 12 मार्च (31 ते 32), 13 (36). 

मार्च 2016 मधील स्थिती 
1 (35), 2 (36), 3 (37), 4 (38), 5 (36), 6 (33), 7 (34), 8 (33), 9 (34), 10 (35), 11 (33), 12 ते 18 मार्च (31 ते 33), 19 ते 22 (33 ते 36), 23 ते 31 (31 ते 33).

Web Title: Winter has brought cold, cough