न्यायाधीशांसमोरच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

घनश्याम नवाथे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

त्या महिलेने डिसेंबर 2014 मध्ये शिंदे यांच्याशी विवाह केला. पती अभियंता असून ते ऑस्ट्रेलियात एका कंपनीत नोकरी करतात. विवाहानंतर काही दिवसांनी दोघांच्यात मतभेद निर्माण झाले...

सांगलीतील घटना : न्यायालयाच्या अवमानाबद्दल गुन्हा दाखल

सांगली : घटस्फोटाचा अर्ज निकाली काढल्यानंतर पुन्हा पतीसोबत नांदायचे आहे, असे सांगून फिर्यादी महिलेने न्यायाधीशांसमोरच स्वत:च्या गळ्याला चाकू लावला. न्यायालयात सोमवारी सायंकाळी या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न, न्यायालयीन कामकाजात अडथळा आणि न्यायालयाच्या अवमानाबद्दल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक केल्यानंतर जामिनावर सुटका झाली.

काय घडले? 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "त्या महिलेने डिसेंबर 2014 मध्ये शिंदे यांच्याशी विवाह केला. पती अभियंता असून ते ऑस्ट्रेलियात एका कंपनीत नोकरी करतात. विवाहानंतर काही दिवसांनी दोघांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर फिर्यादी महिला माहेरी राहायला आली. त्या महिलेने ऑगस्ट 2016 मध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जावर सुनावणी होऊन सोमवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अर्ज निकाली काढला. निकालानंतर सासरची मंडळी गावाकडे निघाली. परंतु, पावणेपाच वाजता फिर्यादी महिला पुन्हा न्यायाधीशासमोर आली. मला पतीसोबत नांदायचे आहे, असे तिने सांगितले.

न्यायाधीशांनी पट्टेवाल्याला पतीला बोलावण्यास सांगितले. तोपर्यंत पती सांगलीहून गावाकडे निघाला होता. पती आला नाही म्हणून महिलेने पर्समधून धारदार चाकू काढून स्वत:च्या गळ्याला लावला.

'या यंत्रणेवर माझा विश्‍वास नाही. सर्व यंत्रणा भ्रष्ट झाली आहे' असा थेट आरोपही तिने केला. महिलेचा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे अटकेनंतर तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली.