दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

अस्तगाव परिसरातील पाच वस्त्यांवर धुमाकूळ; तीन जण जबर जखमी
राहाता - दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तालुक्‍यातील अस्तगाव येथे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी मध्यरात्रीनंतर दोन- अडीच किलोमीटर परिसरातील पाच वस्त्यांवर अडीच तास धुमाकूळ घातला.

अस्तगाव परिसरातील पाच वस्त्यांवर धुमाकूळ; तीन जण जबर जखमी
राहाता - दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तालुक्‍यातील अस्तगाव येथे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी मध्यरात्रीनंतर दोन- अडीच किलोमीटर परिसरातील पाच वस्त्यांवर अडीच तास धुमाकूळ घातला.

देऊबाई शिवाजी खिलारी (वय 65) यांचा मारहाणीमुळे मृत्यू झाला. काठ्या- कुऱ्हाडीने मारहाण केल्यामुळे नळेवस्तीवरील मारुती काशिनाथ मते (वय 60), त्यांची पत्नी नंदाबाई (वय 55) व सून सोनाली (वय 28) जबर जखमी झाले. दरोडेखोरांनी उत्तररात्री दोन ते पहाटे साडेतीनपर्यंत झापाचा मळा, खिलारीवस्ती, देसाई- तांदळेवस्ती, नळेवस्ती व राऊतवस्ती भागात धुमाकूळ घातला. गावकऱ्यांनी आज "गाव बंद' ठेवून निषेधसभा घेतली. दरोडेखोरांना 24 तासांत अटक न केल्यास राहाता येथे "रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा दिला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नळेवस्तीवर जाऊन खिलारी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

शिवाजी खिलारी व त्यांची पत्नी देऊबाई घरासमोर झोपले होते. दरोडेखोरांनी देऊबाई यांच्या अंगावरील 25 हजार रुपयांचे दागिने ओरबाडले. त्यांनी प्रतिकार केल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष नळे यांच्या फिर्यादीनुसार राहाता पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अस्तगावचे माजी सरपंच अशोक नळे यांनी सांगितले, की दरोडेखोर पाच ते सात होते. सर्वांनी तोंडाला काळे फडके बांधले होते.

Web Title: women death by robber beating